पणजी - उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत वीज व पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झालेले आहेत अशी कैफियत विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बार्देश तालुक्यातील अनेक पंच सदस्यांसोबत सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडली. बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.
कळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. वीज मंत्री निलेश काब्राल यांनाही ते भेटले. बार्देश तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. लोक कंटाळले आहेत. हॉटेल्स व रिसॉर्ट्स तर जनरेटरवरच चालतात. यामुळे हवाही प्रदुषित होत आहे, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. गेली पंधरा वर्षे वीज व पाणी क्षेत्रतील ज्या साधनसुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी होती, ती झालेलीच नाही. म्हापसा शहर आणि बार्देश तालुका पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सध्या सामोरा जात आहे, असे लोबो यांनी नमूद केले.
बार्देश तालुक्यात 1970 साली ज्या जलवाहिन्या टाकल्या गेल्या होत्या, त्यांची क्षमता कधीच संपून गेली आहे. त्यांचाच वापर अजुनही सुरू आहे. गेल्या दहा- पंधरा वर्षात नवे बदल झाले नाहीत. केवळ वरवरची डागडुजी तेवढी केली गेली, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. म्हापसा शहराला सध्याही पाणी नाही. मी जेव्हा दर आठवडय़ाला उपजिल्हाधिकारी कार्यालयास भेट देण्यासाठी जातो तेव्हा तिथेही पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले जाते. सरकारी कार्यालयातही पाणी येत नाही व त्यामुळे शौचालयांमधून दरुगधी येते, असे कर्मचारी मला सांगतात असे लोबो यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे. पर्यटन व्यवसायाला स्थिती मारक ठरत आहे. कळंगुटला वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी आम्ही कोमुनिदादीकडून सोमवारी ना हरकत दाखला मिळवून दिला. सुमारे पाच हजार सातशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा कोमुनिदादीने या उपकेंद्रासाठी दिली आहे. बार्देशला एकदा 180 कोटी रुपयांचे वीज केंद्र उभे झाले की, मग वीज समस्या सुटेल. त्यासाठी सरकार पुन्हा निविदा जारी करत असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.