पणजी : गोव्यात सेक्स टुरिझम चालते, असे वाईट चित्र निर्माण झाले आहे. त्याच्या दुष्परिणामांना कॅसिनो तसेच इतर हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या महिलांना सामोरे जावे लागते. त्यांना कमी पगार दिला जातो. कामाच्या ठिकाणी लैंगिक पक्षपातही दिसून येतो. उच्च पदांवर महिलांना घेतले जात नाही. २१ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो व त्याबद्दल त्या असमाधानी आहेत. सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम या संस्थेसाठी काम करणाऱ्या इवान्जेलिन हिने पर्यटन उद्योगात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ८३ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की देशी पर्यटकांशी संवाद साधताना त्यांना वाईट अनुभव आलेला आहे. देशी पर्यटक गट करून येतात तेव्हा त्यांचा इरादा ‘खा, प्या आणि मजा करा’ असाच असतो. मद्यप्राशन करून शेरेबाजी करणे आदी प्रकार घडतात.कॅरोल कुलासो म्हणाल्या की, पर्यटन क्षेत्रातील महिला कर्मचारी असंघटित आहेत. त्यांना पुरेसे प्रशिक्षण, शिक्षण हवे. नेतृत्वगुणही त्यांच्यात यावेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. लैंगिक अत्याचाराचे प्रकार उघडकीस येत नाहीत; कारण आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. हे संशोधन दोन वर्षांपूर्वीचे आहे. आता या प्रकारांमध्ये आणखी वाढ झालेली असेल यात शंका नाही. (प्रतिनिधी)
सेक्स टुरिझमचा अपप्रचार महिला कर्मचाऱ्यांना तापदायक
By admin | Published: February 25, 2017 1:56 AM