मडगाव : मडगावात एका मोठ्या बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगार वस्तीतल्या एका तीन वर्षीय मुलीवर त्याच वस्तीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून तो मुलगाही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे. 6 मे रोजी दुपारी जवळपास कुणी नसल्याचा फायदा उठवून त्या मुलाने उघढ्यावर खेळणाऱ्या त्या मुलीला जवळपास कुणी नसल्याचे बघून आपल्या झोपडीत नेले. तिथे तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीला रक्तश्राव होऊन पोटात दुखत असल्याचे दिसून आल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये आणले असता तिच्यावर अतीप्रसंग झाल्याचे उघड झाले. सध्या त्या मुलीवर गोमेकॉत उपचार चालू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलीची आई सहा महिन्यापूर्वीच बाळंत झाल्याने ती घरीच राहत होती. या मुलीला आणखी 5 वर्षांची मोठी बहिणंही आहे. बुधवारी ती मुलगी आपल्या आजी बरोबर होती आणि ती बाहेर खेळत होती. त्याच ठिकाणी तो मुलगाही होता. तिच्या आजीने त्याला तिथून जायलाही सांगितले होते. पण तो तिथेच राहिला. काही वेळाने तिची आजी दुसरीकडे गेल्याचे पाहिल्यावर त्या मुलाने तिला आपल्या झोपडीत नेऊन तिच्यावर हा अत्याचार केला.
आपल्यावर नेमका कसला अत्याचार झाला हेही त्या मुलीला सांगता येत नसल्याने पोलिसासमोरही ही केस कशी सोडवायची हा प्रश्न उभा राहिला होता. बायलाचो एकवट या संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी त्या मुलीला खोदून खोदून विचारले असता तिने चित्र काढून आपल्यावर झालेला अतिप्रसंग कथित केला. या प्रकाराबद्दल व्हिएगस यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना या घटनेकडे गंभीरतेने पाहण्याची गरज असून ज्या ठिकाणी असे कामगार काम करतात त्याठिकानी त्यांच्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारने पाळणाघराची सोय करण्याची गरज आहे. हे गुंतागुंतीचे प्रकरण सोडविण्यासाठी फातोरडाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्यासह उपनिरीक्षक अमीन नाईक, सुमेधा नाईक व पोलीस शिपाई बबलू झोरे यांनी मोलाची कामगिरी निभावली.