पणजी : किनाय्रांवर देश, विेदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या शॅकचे वांटप पर्यटन खात्याने सुरळीतपणे पार पाडले. उत्तर गोव्यात २५९ आणि दक्षिण गोव्यात १०५ मिळून ३६४ शॅक वितरण काल ड्रॉ पध्दतीने देण्यात आले. किनाय्रांवर प्रत्यक्षात शॅक उभारणी करुन ते सुरु होईपर्यंत आणखी आठ ते दहा दिवस लागतील, असे सांगण्यात आले. पाटो येथे पर्यटन भवन इमारतीसमोर ड्रॅा काढताना शॅक व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. आधी दक्षिण गोव्यातील शॅक वांटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत उत्तर गोव्यातील शॅकवांटप चालू होते.
पर्यटन हंगाम सुरु झाला तरी अजून शॅकवांटप झाले नव्हते त्यामुळे व्यावसायिक नाराज होते. यात भर म्हणून ३ रोजी व्हावयाचा ड्रॅा लांबणीवर टाकला. आधीच विलंबामुळे नाराजी असताना शॅकवांटप आणखी पाच दिवसांनी लांबणीवर पडल्याने व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. परंतु अखेर काल ही प्रतीक्षा संपली व ड्रॉ सुरळीतपणे पार पाडत शॅकवांटपही झाले. वास्तविक ३५९ शॅक देण्यात येणार होते. परंतु नंतर पाच शॅक वाढवण्यात आले व पूर्वीप्रमाणेच ३६४ शॅक देण्याचे ठरले. २०२३-२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किनाय्रांवर हंगामी शॅक, डेक बेड आणि छत्र्यांच्या उभारणीसाठी हे वांटप झालेले आहे.
धोरणानुसार दहा टक्के शॅक एक ते चार वर्षांचा अनुभव असलेल्यांना, दहा टक्के शॅक अनुभव नसलेल्यांना किंवा प्रथमच या व्यवसायात येऊ इच्छिणाय्रांना तसेच उर्वरित शॅक पाच वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या अनुभवी शॅक ऑपरेटरना देण्यात आले आहेत.
आठ-दिवस लागतील : क्रुझ कार्दोझअखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले कि,‘शॅक वांटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. प्रक्रियेबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. प्रदुषण नियंत्रण मंडळाने आता विनाविलंब परवाने द्यावेत, जेणेकरुन शॅक सुरु करता येतील.’ कार्दोझ म्हणाले कि, प्रत्यक्षात पर्यटकांसाठी शॅक खुले होईपर्यंत अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल. १० रोजी पर्यटन अधिकारी जमिनीची आखणी करुन देतील. त्यानंतर पर्यटन खात्याचा परवाना, पंचायतीचा परवाना व अन्य परवाने घ्यावे लागतील. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘कन्सेंट टू ॲापरेट’ परवाना घ्यावा लागेल. सांडपाणी निचरा व्यवस्था शॅक व्यावसायिकांनीच करावयाची आहे