मडगाव: कोलव्यात खासगी जमिनीत उभ्या केलेल्या शॅक्सचे सांडपाणी समुद्र किना-यावर कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते हे उघडकीस आले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यटन खात्याने या बेकायदेशीरपणाकडे गंभीरपणे लक्ष वेधून चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी वादळामुळे दर्याचे पाणी किना-यावर येऊन कोलवा किना:याची मोठय़ा प्रमाणावर जी धुप झाली होती त्यातून हा बेकायदेशीर प्रक़ार उघडकीस आला.कोलव्यात खासगी जमिनीत जे शॅक्सक्स आहेत त्यांचे सांडपाणी आतार्पयत पाईपद्वारे किना-यावर सोडले जात होते. पण हा बेकायदेशीरपणा उघडकीस येऊ नये म्हणून हे पाईप्स रेतीखाली गाडले गेले होते. मात्र वादळी वा-यामुळे खवळलेल्या दर्याने किना-यावरची वाळू विस्कळीत करुन टाकल्याने वाळू खाली दडवलेले हे पाईप्स उघडे पडले. शनिवारी त्यामुळे या भागात बोभाटाही झाला.सोमवारी किनारपट्टीची पहाणी केली असता ते पाईप्स पुन्हा एकदा मातीखाली गाडले गेले आहेत असे दिसून आले. वास्तविक किनारपट्टी नियमन कायद्याप्रमाणे अशाप्रकारे सांडपाणी किना-यावर सोडल्यास त्या आस्थापनाची परवानगी काढून घेण्याची तरतूद आहे. यासंदर्भात पर्यटन संचालक संजीव गडकर यांना विचारले असता, या घटनेची आम्ही दखल घेतली असून किना-याची पहाणी करुन खात्याला अहवाल पाठवावा असे पर्यटन खात्याच्या अधिका-यांना सांगण्यात आले आहे अशी माहिती दिली. तर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोन्तेरो यांनी मंडळाच्या अधिका-यांकडून या उल्लंघनाची पहाणी केली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.