पणजी - कला अकादमीच्या नुतनीकरणासाठी कोटेशन न मागविता कंत्राट बहाल करून सीपीडब्ल्युडी नियमाचे उल्लंघन का केले या प्रश्नावर उत्तर देताना गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत ताजमहालचे उदाहरण दिले. कोटेशन पद्धतीने शहाजहानाने ताजमहाल बांधला असता तर तो टीकलाच नसता असे ते म्हणाले.
विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी यासंदर्भात विधानसभे प्रश्न उपस्थित केला होता. या बांधकामाच्या कंत्राटासाठी कंत्राटदार निवडताना आणि कंत्राट बहाल करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन का करण्यात आले नाही? निविदा जारी करून बोली मागविणे या सारखी प्रक्रिया पार न पाडता कंत्राट का बहाल केले? केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गदर्शक तत्वांचे (सीपीडब्ल्युडी) पालन का करण्यात आले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यावर आपली बाजू मांडताना मंत्री गावडे यांनी ताजमहालाचे आणि शहाजहानाचे उदाहरण दिल्यामुळे सभागृहातील सदस्यांनी आणि गँलरीत बसलेल्यांनीही भुवया उंचावल्या. कारण मंत्री साहेबांचे म्हणणे होते, की शहाजहानने ताजमहाल बांधण्यासाठी कोटेशन मागवले असते, तर इतकी भव्य कलाकृतीची निर्मिती झालीच नसती आणि ती एवढे दिवस टिकलीही नसती.
यावर आमदार सरदेसाई यांनी त्यांना प्रतिप्रश्न करत कोंडीत पकडले. तसेच, शहाजहान आणि ताजमहालाचे उदाहरण देऊन आपण सीपीडब्ल्युडी नियमांचे उल्लंघन केल्याचे मानन्य केले, असेही सांगितले. तसेच, यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याडे केली.
यावर, हा प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून, कोटेशन न मागविता मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन कंत्राट बहाल करण्यात आल्याचे मंत्री गावडे आणि मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. परंतु आमदाराचे यावर समाधान झाले नाही.