नारायण गावस, पणजी : नीट परीक्षेसाठी फोंडा येथील केंद्राचे कुंकळ्ळी येथो स्थलांतर करण्यात आले आहे. देशभर नीट यूजी परीक्षा २०२४ रविवारी ५ मे राेजी होणार असून, गोव्यातही पाच केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. एनआयटी गोवा यातील एक केंद्र आहे. यंदा एनआयटीमध्ये हाेणारी नीट परीक्षा फोंडा येथे न होता एनआयटीच्या नव्या संकुलात कुंकळ्ळी येथे होणार आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी फार्मागुडी फोंडा येथे न येता एनआयटीच्या नव्या संकुलात कुंकळ्ळी येथे परीक्षा देण्यास हजर राहावे, असे आवाहन एनआयटीचे प्रमुख ओमप्रकाश जस्वाल यांनी शुक्रवारी पर्वरी येथील तंत्रशिक्षण संचालनालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एनआयटी गेली १४ वर्षे नीटची परीक्षा घेत आहे. पण यावर्षी एनआयटीचे नवे संकुल कुंकळ्ळी येथे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याची माहिती असावी यासाठी पत्रकार परिषदेत घेण्यात आली आहे. जर विद्यार्थी चुकून फार्मागुडी फाेंडा येथे आले, तर त्यांना पुन्हा कुंकळ्ळी येथे पाेहोचावे लागणार आहे. याचा फटका त्यांना परीक्षेवर बसू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी कुंकळ्ळी येथील नव्या संकुलात यावे. एनआयटीमध्ये एकूण ३६० नीट यूजी २०२४ परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी असणार आहे. यात बहुतांश गाेमंतकीय विद्यार्थी असून, काही मोजकेच बाहेरील विद्यार्थी आहेत.