वास्को: दोन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ जहाज गुरूवारी (दि.१८) सकाळी ११.३० वाजता मुरगाव बंदरात (क्रुज जहाजाच्या धक्यावर) दाखल झाले. यासर्व बांधवांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी जहाजावरच नमूने घेण्यात येणार असून चाचणीचे अहवाल येई पर्यंत ते मुरगाव बंदरात दाखल झालेल्या सदर जहाजातच राहणार असल्याची माहीती मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) च्या सूत्रांकडून उपलब्ध झाली.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केल्यानंतर विविध देशात अडकून राहीलेल्या गोमंतकीय बांधवांना आपल्या राज्यात आणण्याचे काम चालू आहे. मागच्या काही काळात विविध जहाजावर खलाशी म्हणून काम करणाऱ्या तसेच विविध देशात कामाला असलेल्या गोमंतकीय बांधवांना विमान मार्गे, मुंबईहून रस्ता मार्गे अशा विविध प्रकारे आणण्यात आले आहे.
गुरूवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ हे जहाज दोन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदराच्या समुद्र हद्दीत पोचले. मुरगाव बंदरात दाखल झालेले सदर खलाशी बांधव ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ तसेच ‘एंथम आॅफ द सी’ या जहाजावर काम करणारे कर्मचारी असल्याची माहीती एमपीटी सूत्रांकडून प्राप्त झाली. हे जहाज जरी सकाळी ८.४५ च्या सुमारास मुरगाव बंदराच्या समुद्राच्या हद्दीत पोचले तरी पावसामुळे हवामानात बिघाड झाल्याने जहाज सकाळी १०.३० च्या सुमारास ‘पायलट स्टेशन’ वर पोचले असून नंतर ११.३० च्या सुमारास मुरगाव बंदरात दाखल झाल्याची माहीती सूत्रांनी दिली.
या १४५० गोमंतकीय बांधवांचे कोरोना विषाणूबाबत जहाजावरच चाचणीसाठी नमूने घेण्यात येणार असल्याची माहीती एमपीटी मधील सूत्रांनी देऊन जो पर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तो पर्यंत त्यांना जहाजावरच ठेवण्यात येणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. सदर बांधवांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर लागू करण्यात आलेल्या ‘एसओपी’ च्या नियमानुसार त्यांना घरी पाठवण्याची पुढची पावले उचलण्यात येणार असल्याची माहीती एमपीटी मधील सूत्रांनी दिली. गुरूवारी सकाळी सदर जहाज मुरगाव बंदरात (एमपीटी) येत असल्याने या जहाजावर असलेल्या बांधवांची कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी तसेच इतर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी येथे आरोग्य खात्याचे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी उपस्थित असल्याची माहीती सूत्रांनी दिली.