पणजी : दोनापॉलजवळ भरकटत येऊन लागलेल्या नाफ्थावाहू जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्याच्या कामातील अडचणी वाढल्या आहेत. बुधवारी हेलिकॉप्टरव्दारे हायड्रॉलिक पंप या जहाजावर नेण्यात येत असता तो पाण्यात पडला. मुंबईहून दुसरा पंप मागवावा लागला असून हे काम लांबणीवर पडले आहे.
जहाजात 2600 मेट्रिक नाफ्था असून जहाजाला तडे पडल्यास या नाफ्थ्याची गळती होऊन गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे नाफ्था दुसऱ्या जहाजात हलविण्याचे ठरले होते व त्यानुसार हायड्रॉलिक पंपही मागविण्यात आला होता. नौदलाच्या हेलिकॉप्टरने हायड्रॉलिक पंप नेण्यात येत होता. हेलिकॉप्टर मुरगांव बंदरापासून काही अंतरावर पोचले असता पंप पाण्यात पडला.
दुसरा पंप आल्यानंतरच काम सुरु : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘दुसरा हायड्रॉलिक पंप आल्यानंतरच हे काम सुरु होईल. त्यासाठी एक दिवस लागेल. भरकटत येऊन लागलेल्या जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतील. तसेच मिलिंदवरील आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले आहे. त्याचप्रमाणे खोटे आरोप करणं बंद करुन आपत्तीत सहकार्य करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
दरम्यान, ‘हे नाफ्थावाहू जहाज गोव्यात आणण्यामागे मंत्री मिलिंद नाईक यांचा हात असल्याचा आणि यामागे भ्रष्टाचाराचा जो आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे, तो मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, ‘या जहाजाशी मंत्रिमंडळातील कोणाचाच कसलाही संबंध नाही. विरोधक काहीतरी बोलावे म्हणून बोलत असून चुकीचे आरोप करीत आहेत. एमपीटीच्या अधिकाºयांकडे मी बैठक घेऊन माहिती मिळविली आहे. जहाज कुठून आले, कुठे जात होते हे जाणून घेतलेले आहे. जहाज भरकटलेले असल्याने जी आपत्ती ओढवली आहे ती दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे सोडून विरोधक बेताल आरोप करीत सुटले आहेत.’