लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : महाराष्ट्रातील शिवसेना नेते केवळ निवडणुकीच्या वेळी गोव्यात येऊन बेटकुळ्या फुगवून दाखवतात. पण गोव्यातील राजकारणात शिवसेनेला काहीही महत्त्व नाही हे पुन्हा गुरुवारी लागलेल्या निकालाने दाखवून दिले आहे. आम आदमी पार्टी व रिवोल्यूशनरी गोवन्सने विधानसभेत खाते खोलले. मात्र, शिवसेनेचे चाचपडणे सुरूच आहे.
शिवसेनेला गोव्यात ०.१८ टक्के मते मिळाली आहेत तर नोटाला १.१२ टक्के मते मिळाली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसला १.१४ टक्के मते मिळाली आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वारंवार गोव्याला भेटी दिल्या. त्यांनी उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हापसा, डिचोली, वास्को, साखळी येथे सभाही झाल्या. या चारही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटही ते वाचवू शकले नाहीत.
तीन जोडपी जिंकली, दोन पराभूतविधानसभा निवडणुकांमध्ये उतरलेल्या पाच जोडप्यांपैकी दोन जोडपी पराभूत झाल्यानंतर आता तीन जोडपी विधानसभेत पोहोचणार आहेत. भाजपचे विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे, बाबुश मोन्सेरात व जेनिफर मोन्सेरात आणि काँग्रेसचे मायकल लोबो व त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनी विधानसभेत आपली जागा पक्की केली आहे. माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा पराभव अनपेक्षित आहे. हळदोणे मतदार संघातून लढलेले किरण कांदोळकर व थिवी मतदार संघातून उतरलेल्या त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.
आलेमांव पिता-पुत्री पराभूतबाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून तृणमूल काँग्रेसमध्ये उडी घेतली होती. त्यांनी बाणावलीची जागा लढवली तर मुलगी वालंका आलेमाव यांना नावेलीची जागा दिली. या दोन्ही जागा त्यांना गमवाव्या लागल्या.
तृणमूल काँग्रेसच्या हाती भोपळातृणमूल काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा हल्लागुल्ला केला होता. मात्र, त्याचे पुरेशा मतांमध्ये परिवर्तन करता आले नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सहकार्याने तृणमूलने एकूण ३९ जागा लढवल्या होत्या. त्यातील १४ जागा मगोपने लढवल्या व त्यांना दोन जागा प्राप्त झाल्या. तर तृणमूलला २५पैकी एकही जागा प्राप्त करता आली नाही.