पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे कुंकळ्ळी मतदारसंघातून देवेंद्र देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी देसाई यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गोवा सुरक्षा मंचशी युती झाल्यानंतर शिवसेना पाच मतदारसंघांतून निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी शिवसेनेतर्फे साळगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यानंतर शुक्रवारी कुंकळ्ळीतून देसाई यांचे नाव जाहीर करण्यात आले. देवेंद्र देसाई कुंकळ्ळी येथील माजी नगराध्यक्ष असून ते ५ वर्षे नगराध्यक्ष होते. शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी पाच मतदारसंघांतून उमेदवार उभे केले जातील. यात कुंकळ्ळी, साळगाव, थिवी, पेडणे व वास्को या जागा निश्चित झाल्या असून राहिलेल्या तीन मतदारसंघांतही लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे गोवा दौऱ्यावर येणार असून त्यांच्या थिवी, साळगाव व कुंकळ्ळी येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गोसुमंबरोबर युती झाल्यानंतर आता मगोपशीही युती होणार आहे. येत्या विधानसभेत शिवसेना-गोसुमं युतीचे किमान तीन आमदार, मंत्री शिवसेनेचे असतील, अशी आशा राऊत यांनी या वेळी व्यक्त केली. भाभासुमंचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांच्याकडे युतीचे नेतृत्व सोपविले आहे. शिवसेना युतीसाठी जागांबाबत तडजोड करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले. गोव्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर काळ्या पैशांचा व्यवहार चालत असेल तर त्यावर शिवसेनेची करडी नजर असेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
कुंकळ्ळीत देवेंद्र देसाई यांना शिवसेनेची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 3:17 AM