म्हापसा : शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून १२ फूट उंच अश्वारूढ पूर्णाकृती असा महाराजांचा पुतळा येथील हुतात्मा चौकासमोर बसविण्यात आला आहे. ही म्हापसावासीयांसह शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी असली तरीही या पुतळ्यांचे अनावरण जिल्हा पंचायतीच्या आचारसंहितेमुळे सध्या लांबणीवर पडले आहे.या अश्वारूढ पुतळ्याची मूळ प्रतिकृती ही कलाकार सचिन मदगे यांनी बनवली आहे. ही मूर्ती पुण्यात तयार केली असून ती पितळेची आहे. हा पुतळा दहा फुटी बांधलेल्या फलाटावर उभारला आहे. मात्र, सध्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आचारसंहिता हटविल्यानंतरच या पुतळ्याचे अधिकृतरित्या उद्घान होणार असल्याची माहिती मिळाली आहे.हुतात्मा चौक ते गांधी चौक परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून याअंर्तगत हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारला आहे. हे काम रोटरी क्लब ऑफ म्हापसा सिटीमार्फत होत आहे. यापूर्वी हुतात्मा चौकात शिवाजी महराजांचा अर्धपुतळा होता. मात्र, सध्या हा पुतळा हटवून आता अश्वारूढ महाराजांचा पुतळा उभारला आहे.या सौंदर्यीकरणासह शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाखांची तरतूद केलेली. मात्र, हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. महाराजांचा पुतळा हा पितळ्याचा बनविला असून याचे वजन २५०० किलो म्हणून अडीज टन आहे. यात पुतळ्याचा खर्च हा २५ लाख आहे. दि. २४ जानेवारी २०१९ रोजी म्हापसा नगरपालिकेने ठराव मंजूर घेत शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता.दरम्यान, म्हापसा पालिका, शिवप्रेमी व इतर चाहत्यांनी दि. १६ रोजी पूर्वीचा शिवरायांचा अर्धपुतळा हटवून तो एका विशिष्ट जागेत ठेवण्यात आला.
म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 3:05 PM