वास्को: दक्षिण गोव्यातील जेटी, सडा येथे राहणा-या संगमेश रायप्पा वरगलदिन्नी नावाच्या १३ वर्षीय मुलाने सोमवारी (दि.१९) संध्याकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. संगमेश याची संध्याकाळी ४ वाजता ‘ऑनलाईन’ गणित विषयाची परिक्षा होती व तो परिक्षेसाठी अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे मुरगाव पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, संध्याकाळी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. ८ वी इयत्तेत शिकणा-या संगमेशची संध्याकाळी ४ वाजता परीक्षा होती. परीक्षेचा अभ्यास न करता तो खेळत असल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने रागाच्या भरात खोलीत जाऊन त्यांने दरवाजा आतून बंद केला. बराचवेळ संगमेश दरवाजा उघडत नसल्याने आई व भावा बहिणींनी दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली, मात्र आतून आवाज येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता संगमेशने दुपट्याच्या मदतीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरित संगमेशला खाली उतरवून उपचारासाठी त्वरित त्याला चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात घेऊन गेले, मात्र येथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
संगमेशच्या हितासाठीच त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने अशा प्रकारचे पाऊल उचलल्याने त्याच्या शेजा-यात व परिसरात एक प्रकारचे धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश याला अन्य सहा भावंडे असून यापैंकी तीन बहिणी व तीन भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही काळापूर्वी संगमेशच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:ख्खाचे सावट असतानाच आता संगमेशने आत्महत्या केल्याने त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुरगाव पोलिसांनी संगमेशच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. मंगळवारी त्याच्यावर शवचिकित्सा करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सजित पिल्ले अधिक तपास करीत आहेत.