वास्को: दक्षिण गोव्यातील झुआरीनगर, बिर्ला येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मुत्तप्पा कंटी याने त्याचे वडील बसप्पा कंटी (वय ६५) यांच्यावर लाकडी फळीने डोक्यावर हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर बांबोळीच्या गॉमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. बसप्पा काही काळापूर्वी निवृत्त झाल्याने त्यांना मिळालेल्या निवृत्ती रकमेपैकी काही पैसे मुत्तप्पाने मागण्यास सुरुवात केली असता, यास नकार दिल्याने त्याने वडिलावर बुधवारी (दि. ८) हल्ला केला. वेर्णा पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास मुत्तप्पा यास ३२६ कलमाखाली अटक केली.वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सदर प्रकरण घडले. झुआरीनगर येथे असलेल्या जुन्या पेट्रोल पंपसमोर ६५ वर्षीय बसप्पा कंटी आपल्या दोन मुला व एका मुलीसहीत घरात राहतो. बसप्पा काही काळापूर्वी जेथे काम करत होता, तेथून निवृत्त झाल्यानंतर त्याला एक चांगली रक्कम मिळाली. बसप्पा याचा ३५ वर्षीय अविवाहित मुलगा मुत्तप्पा बेरोजगार असल्यानं तो वडीलांकडे पैशांसाठी तगादा लावत होता. बसप्पा त्याला पैसे देत नसल्याने दोघात या विषयावरून बुधवारी वाद निर्माण झाल्यानंतर मुत्तप्पाने बसप्पाच्या डोक्यावर लाकडी फळीने जबर हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. सदर मारहाणीच्या प्रकरणात बसप्पा यांच्या डोक्याला तसेच चेह-याला गंभीर जखमा झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी देऊन त्यांच्यावर सध्या गॉमेकॉ इस्पितळात उपचार चालू असल्याचे सांगितले.उपचार घेत असलेल्या बसप्पा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वेर्णा पोलिसांकडून मिळाली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास ३५ वर्षीय मुत्तप्पा यास अटक केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी सांगितले. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! पैसे देत नसल्याने मुलाने वडिलांवर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 10:59 PM