दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी १ हजार रुपयांची वर्गणी देण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशांवरून राज्यातील राजकारण पेटले आहे. गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने या आदेशावर टीका केली आहे. दरम्यान, वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सावंत सरकारने खजिना रिकामी केला आहे. आता सरकारी कामांसाठी वर्गणीची मदत घेतली जात आहे.
१९ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आले की, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून २६ जानेवारी २०२३ रोजी मटान्ही सालडाणा प्रशासकीय परिसर मैदानामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित होणार आहे. इच्छुक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांची वर्गणी द्यावी, असं आवाहन करण्यात आलं होतं.
जिल्हाधिकाऱ्यांनी दोन अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. त्यांच्याकडे २० जानेनापर्यंत कर्मचाऱ्यांकडून वर्गण गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या पत्रकावरून वाद पेटला असतानाच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, हे योगदान आहे की वसुली? गोवा सरकार पूर्णपणे दिवाळखोर झालं आहे काय, त्यामुळे प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा करत आहेत. गोवा सरकार आणि त्याचा कॅबिनेटने सरकारी खजिना पूर्णपणे रिकामी केला आहे. आता सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करावी लागत आहे.
आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनीही यावरून गोवा सरकारवर निशाणा साधला आहे. तुमच्याकडे भ्रष्ट आचरण असलेल्या कार्यक्रमांवर वाया घालवण्यासाठी जगभराचा पैसा आहे. मात्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मात्र वाद वा ढल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चाइल्ड केअर इन्स्टिट्युशन आणि वृद्धाश्रमांना मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आल्याचे सांगितले.