पणजी: एकच फोन क्रमांक दोघा जणांना दिल्याबद्दल आयडीया सेल्युलर या मोबाईल नेटवर्क कंपनीविरुद्ध गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे अज्ञात गुन्हेगाराकडून तक्रारदाराच्या बँक खात्यातून ७.५ लाख रुपये लाटले आहेत.
कोणतीही खातरजमा न करता बेकायदेशीरपणे एकच मोबाईल क्रमांक दोघा जणांना देण्याचा अक्षम्य गुन्हा मोबाईल नेटवर्क कंपनीकडून करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार शीला गावणेकर या महिलेला जे सीमकार्ड देण्यात आले होते त्या सीमकार्डचेच डुप्लीकेट सीमकार्ड आणखी एका इसमाला देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा क्रमांक तक्रारदाराच्या बँक खात्याला जोडलेला असल्यामुळे ज्याला हा क्रमांक देण्यात आला त्याने ओटीपी मिळवून तक्रारदाराचे बँक खाते साफ केले आहे. खात्यातून ७.५ लाख रुपये काढण्यात आले आहेत. तक्रारदार गावणेकर या दक्षीण गोव्यातील आहेत. सायबर गुन्हा विभागाकडून फसवणू, कागदपत्रांत फेरफार करणे आणि कारस्थान करणे असे ठपके ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकच क्रमांक दोघांना देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. बोगस कागदपत्रे सादर करून सीमकार्ड घेण्याची प्रकरणे घडली होती, परंतु असा प्रकार हा केवळ कंपनीच्याच चुकीमुळे होण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणे एखादे सीमकार्ड खूप दिवस वापरले नाही किंवा रिचार्ज केले नाही तर कंपनीकडून ती रद्द केली जातात आणि ते दुसऱ्याला देण्यास कंपनी मोकळी असते. तशा प्रकारच्या अटी सीमकार्ड घेताना गिऱ्हायिकाकडून मंजूर करून घेतल्या जातात.
या प्रकरणात असेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात सायबर गुन्हा विभागाचे पोलीस तपास करीत आहेत. त्याच प्रमाणे एक क्रमांक दोघांना दिला जाऊ शकतो आणि ते वापरले जाऊ शकतात हेही उघड झाले आहे. या प्रकरणामुळे आयडिया सेल्युलरचा गिऱ्हायिक असलेला तक्रारदार पैसे गमावून बसला आहे तर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे कंपनीही अडचणीत आली आहे.