पणजी : कळंगुट- कांदोळीच्या नव्या बाह्यविकास आराखडय़ामुळे (ओडीपी) कळंगुटमध्ये दुकाने, गेस्ट हाऊस, विस्तारित घरे कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा मुद्दा आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी येथे मांडला. कळंगुट परबावाडो येथील शेतात उभी झालेली 54 बांधकामे मोडली जातील, कारण ती जागा आरोग्य केंद्रासाठी कोमुनिदादीने दिलेली आहे, असेही लोबो यांनी सांगितले. ओडीपीचा सारा भर हा पर्यटनावर असल्याचे ते म्हणाले.
ओडीपीच्या मसुद्यावर आधारित पूर्वी परवाने दिले जात होते म्हणून उच्च न्यायालयाने आम्हाला अगोदर ओडीपीला अंतिम रुप द्या व मगच अंमलबजावणी करा, असा आदेश दिला होता. त्यामुळे आम्ही मसुद्याला अंतिम रुप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मसुदा आम्ही सूचना व आक्षेपांसाठी खुला केला आहे, असे लोबो म्हणाले. कळंगुट-कांदोळीच्या हिताच्यादृष्टीने ओडीपी महत्त्वाचा आहे. स्थानिकांनी वीनापरवाना बांधलेली विस्तारित घरे, छोटी हॉटेल्स, गेस्ट हाऊस यांना कायदेशीर करण्याची तरतुद ओडीपीच्या मसुद्यात करण्यात आली आहे. स्वत:च्याच जागेत ज्यांनी बेकायदा बांधकाम केले ते कायदेशीर केले जाईल. स्थानिकांना त्यासाठी प्रसंगी ज्यादा एफएआरही दिला जाईल. काही राजकीय विरोधक या ओडीपीला आक्षेप घेत आहेत. त्यांनी त्यांच्या सूचना व आक्षेप सादर करावेत. प्रत्येक सूचनेबाबत प्रत्यक्ष पाहणीचे काम फिल्डवर जाऊन एनजीपीडीएकडून केले जाईल, असे लोबो यांनी नमूद केले.
सोमवारी एनजीपीडीएने कळंगुट-कांदोळी-हडफडेच्या पट्टय़ातील सरपंच,पंच, कोमुनिदाद संस्था यांची एकत्रित बैठक घेतली. ब:याच कोमुनिदादींच्या जमिनी कळंगुट-कांदोळीच्या पट्टय़ात असून विकास प्रकल्प उभे करण्यासाठी त्यांचे सहकार्य हवे आहे. या सर्व लोकप्रतिनिधींनी व कोमुनिदादींनी ओडीपी लोकांर्पयत न्यावा व लोकांमध्ये जागृती करावी म्हणून बैठक घेतल्याचे लोबो यांनी सांगितले.
कळंगुटमध्ये मोठे सभागृह
ताळगावमध्ये जसे मोठे कम्युनिटी सभागृह आहेत, तसेच सभागृह कळंगुटमध्ये 5क् हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत उभे केले जाईल. 750 चौरस मीटर क्षेत्रफळात बहुउद्देशीय कार पार्किग प्रकल्प उभा केला जाईल. इनडोअर स्टेडियम, बालोद्याने अशा अनेक प्रकल्पांची तरतुद ओडीपीमध्ये केली आहे. कांदोळीत काही बालोद्यानांचे कामही सुरू झाले आहे, असे लोबो यांनी सांगितले. आम्ही एकाही खारफुटीची कत्तल करणार नाही. सिकेरी ते बागा ते हडफडे असा पंचवीस मीटर रुंदीचा जो रस्ता बांधला जाणार आहे, त्यामुळे एक देखील घर मोडावे लागणार नाही, असे लोबो यांनी नमूद केले.