लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नाताळनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चर्चमध्ये प्रार्थना सुरू होत्या. सोमवारी देखील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांसह पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर नववर्षाच्या स्वागतासाठीही पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागली असून, पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सध्या जुने गोवे येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिजस परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या चर्चचे वैभव पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करते. गोव्यासह जगभरातील खिस्ती बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. नाताळनिमित्त लोकांनी आपल्या नातेवाइकांसह मित्रांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येने पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. डिसेंबरमध्ये किनारी भागात अनेक संगीत रजनी पार्त्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्त्यांमध्ये पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. सध्या राज्यातील वारसा स्थळे, प्रसिद्ध ठिकाणे व किनारी भागात पर्यटकांची अलोट गर्दी असते.
सेलिब्रिटी पार्ट्यांसाठी सज्ज
नवीन वर्षाच्या राज्यात सेलिब्रिटींसह राजकीय नेते, क्रिकेटर्स, सेवानिवृत्त अधिकारी दाखल होत आहेत०. गेल्या आठवड्यापासूनच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शिल्पा राव, बी प्राक यांचे कॉन्सर्ट पार पडले आहे. तर अभिनेत्री इशा गुप्ता सध्या गोव्यात आहे. २९ रोजी अभिनेत्री सोफी चौधरी, तर ३१ रोजी गायक सोनू निगम येणार आहे. त्याचप्रमाणे कीर्ती वर्मा, शब्बीर कुमार, सपना चौधरी, कुमार शर्मा हे कलाकार येत आहेत.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
राज्यातील सर्व प्रसिद्ध ठिकाणे, किनारी भाग, वारसा स्थळांसह प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ८०० पोलिस वाहतूक व्यवस्थेवर वॉच ठेवून आहेत. तर किनारी भागात साध्या वेशातही पोलिस तैनात केले आहेत. पर्यटकांची फसवणूक होऊ नये, बेकायदेशीर गोष्टींवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दृष्टीतर्फे जीवरक्षकांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.
विद्युत रोशणाई आकर्षण
राज्यातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ख्रिस्ती बांधवांची घरेदेखील रोषणाईने झगमगटून गेली आहेत. पणजी चर्च स्क्वेअरला तर या दिवसात पर्यटकांची पसंती असते. अनेक प्रमुख रस्त्यांवर सजविलेले स्टार्स व ख्रिसमस ट्री, गोटे, सांताक्लॉज यांचे दर्शन होत आहे.