अजय बुवा, फोंडा : बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकावर अज्ञाताने गोळीबार करण्याचा प्रकार घडला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. सचिन कुरटेकर (वय ३३, रा. उसगाव) असे त्याचे नाव आहे. या प्रकारामुळे फोंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सचिन कुरटेकर हा सकाळी दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. बोरी येथे एका ठिकाणी तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. घरातून बेतोडा जंक्शनवर सचिन पोहोचला असता त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. ही गोळी त्याच्या खांद्याला लागून तो जखमी झाला.या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक आर्शी आदील, पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर हेसुद्धा लगेचच गोळीबार झालेल्या ठिकाणी दाखल झाले. घटनास्थळी तातडीने विविध विभागाच्या तंत्रज्ञांना बोलावून लगेचच तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी युवक सचिन कुरटेकर याच्यावर यापूर्वीसुद्धा विविध प्रकारे हल्ले झाले आहेत. त्याबरोबर तोसुद्धा अनेक मारामारीच्या प्रकारात सामील असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी तूर्तास एका घटनेवरून त्याच्यावर गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु त्याच्यावर गोळीबार करण्याचे खरे कारण इतर काहीतरी असावे असा संशय पोलिसांना आहे.