लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने आपली स्वत:ची जागा निश्चित करावी, सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मडगावच्या एमसीसी हॉलमध्ये आयोजित गोवा क्रिकेट असोसिएशनच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मडगावचे आमदार दिगंबर कामत, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई, खजिनदार दया पाणी, माजी सभापती राजेश पाटणेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जीसीएच्या मैदानाबाबत अभ्यास करा, पर्वरी जिमखाना व एमसीसीवर जसे सेंटर विकसित केले आहेत तसे भविष्यात प्रत्येक तालुका स्तरावर सेंटर सुरू होण्याची गरज आहे. सागचे मैदान शोधून काढावे, प्रत्येक तालुक्यात एक मैदान उपलब्ध करून देण्याची सरकारची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जागतिक बीच व्हॉलीबल स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे चार, तीन व एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. राज्यात क्रीडा व अॅडवेन्चर्स पर्यटन विकसित होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात गोव्यातून दिलीप सरदेसाई यांच्यानंतर एकही कसोटी क्रिकेट खेळाडू तयार झाला नाही, आता किमान पाच तरी कसोटी क्रिकेट खेळाडू तयार व्हायला पाहिजे, असे सांगितले. सागची अनेक मैदाने आहेत. मात्र अधिकाऱ्यांनाच ही मैदाने कुठे आहेत, हे माहीत नाही, असेही ते म्हणाले. विपुल फडके यांनी स्वागत केले. रोहन गावस देसाई यांचेही भाषण झाले.