लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: सोपो घोटाळा व पे पार्किंग कंत्राटदाराला बेकायदा दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीवाढीच्या विषयावरून शुक्रवारी पणजी मनपाच्या बैठकीत मोठा हंगामा झाला. यावेळी पे पार्किंगच्या मुद्दयावरून तुम्हाला आपण सेवेतून निलंबित करून दाखवतो, असे थेट आव्हानच नगरसेवक उदय मडकईकर यांनी मनपा आयुक्त क्लेन मदेरा यांना दिले.
पणजी मार्केटमधील विक्रेत्यांकडून सोपो घेतला जातो. त्याबदल्यात त्यांना पावती दिली जात नाही. हा प्रकार हा दोन वर्ष नव्हे तर १५ वर्षे सुरू असल्याचा दावा खुद्द आयुक्तांनीच केला आहे. मग ते कारवाई का करीत नाहीत, गप्प का आहेत? सोपो गोळा केल्यानंतर विक्रेत्यांना पावती देण्यासाठी मनपाने इलेक्ट्रॉनिक मशिन खरेदी केले होते. ते मशिन कुठे आहे? असा प्रश्नांचा भडिमार मडकईकर तसेच नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी आयुक्तांवर केला.
कंत्राट एप्रिलमध्ये संपुष्टात आले. त्याला पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला. हा निर्णय घेताना त्यावर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, बैठक न घेताच हा निर्णय झाला. त्याउलट आपण पे पार्किंग कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याची शिफारस केल्याचा खोटा शेरा आयुक्तांनी फाइलवर मारून त्याला मंजूरी दिली. महापौर रोहित मोन्सेरात यांनीही त्यावर सही मारली. आयुक्तांनी आपल्या नावाचा बनावटपणे वापर केल्याचा आरोप मडकईकर यांनी केला. त्यामुळे बराच हंगामा झाला.
याविरोधात आपण मुख्य सचिव तसेच दक्षता खात्याकडे तक्रार करणार असून, तुम्हाला सेवेतून निलंबित करूनच दाखवतो. असे थेट आव्हान त्यांनी आयुक्तांना दिले. त्यावर आयुक्तांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण मंडळ ठरणार अपात्र
पणजी मनपाचे पोटनियम अजूनही अधिसूचित झालेले नाहीत. त्यामुळेच मनपाचा कारभार सैरभरपणे चालत आहे. पोटनियम अस्तित्त्वात नसताना मनपाचे प्रशासन चालत असल्याच्या विरोधात कुणी न्यायालयात गेले, तर संपूर्ण मंडळ अपात्र ठरेल. त्यामुळे लवकरात लवकर हे पोटनियम अधिसूचित करावेत, अशी मागणी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केली.
फुर्तादो- काब्राल जुंपली
पणजी मनपाचा अर्थसंकल्प अवघ्या पाच मिनिटांत मांडण्यात आल्याच्या मुद्दयावरून नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व नाझारेथ काब्राल यांच्यात जुंपली. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अर्थसंकल्पीय बैठकीची नोटीस सात दिवस अगोदर येणे अपेक्षित असते. मात्र, ती आली नाही. सदर अर्थसंकल्प बोगस असल्याचा आरोप फुर्तादो यांनी केला. त्यावर काब्राल यांनी नोटीस सर्वांना वेळीच आली होती, तुम्हालाच ती वेळेत कशी मिळाली नाही, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
१५ वर्षांपासूनची चौकशी करा
सोपो घोटाळा १५ वर्षापासूनचा असेल तर १५ वर्षापूर्वी जे कोण मनपाचे महापौर होऊन गेले, त्यांच्यासह अधिकारी, सोपो कंत्राटदार, सुपरवायझर यांचीही चौकशी करावी माजी महापौर या नात्याने आपण चौकशीस तयार असल्याचे उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले.
त्या कामगाराला हजर करा
पणजी मार्केटमधील विक्रेत्यांकडून पावतीशिवाय सोपो गोळा करणाऱ्या मनपाच्या कामगाराला बैठकीत हजर करा, अशी मागणी विरोधी तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी केली. सदर सोपो घोटाळा हा लाखो रुपयांच्या घरात आहे. त्या कामगाराला याबाबत विचारल्यास तो अरेरावीची भाषा वापरतो, असा आरोप नगरसेवक उदय मडकईकरांनी केला. मात्र, आयुक्त तसेच महापौरांनी ही मागणी फेटाळली.