लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणे आणि श्रीरामाची स्थापना हा एक राष्ट्रीय उत्सवच होणार आहे. अशा उत्सवातून देव देवतांचा आशीर्वाद आणि भक्तिमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे उद्गार मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी काढले.
मोरजी येथे दि. १० रोजी चलो अयोध्या कार्यक्रमाचा प्रचार व जागृती करण्यासाठी पेडणे तालुका रॅलीचे आयोजन मोरजाई देवी मंदिर परिसरात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार आरोलकर बोलत होते. यावेळी मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मोरजीचे सरपंच मुकेश गडेकर संप्रदाय मोरजी प्रमुख रमेश दाभोलकर, विजय शेटगावकर, महेश गोडकर, श्री. शेलार, व्ही. जी. शेटगावकर व इतर उपस्थित होते.
सुरुवातीला श्रीदेवी मोरजाई मंदिरात दर्शन घेऊन रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. श्रीदत्त पद्मनाभतर्फे, श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन तथा दिव्य मूर्ती प्रतिष्ठापना ऐतिहासिक महोत्सवानिमित्त चलो अयोध्या या महाअभियानाचा प्रारंभ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या हस्ते करण्यात आल्यानंतर, संपूर्ण तालुक्यात चलो अयोध्या अभियान रॅलीचा प्रारंभ केला. त्याचाच एक भाग म्हणून दि. १० रोजी मोरजीत रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
दोन्ही जिल्ह्यांत रॅली
या अभियानाअंतर्गत गोव्यातील उत्तर व दक्षिण जिल्ह्यात विशेष भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास समस्त हिंदू धर्मियांनी मोठ्या संख्येने प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीदत्त पीठ पद्मनाभ संप्रदायातर्फे केले आहे. ब्रह्मेशानंद स्वामींना अयोध्या मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने निमंत्रण मिळालेले आहे. हे समस्त गोमंतकीयांना निमंत्रण आहे, असे संप्रदायाचे श्री. शेलार यांनी सांगितले.
पेडणे तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत
मोरजाई मंदिर येथे रॅलीचा प्रारंभ केल्यानंतर चोपडे वेताळ मंदिर, आगरवाडा सातेरी मंदिर, मांदे श्रीराम मंदिर, मांदे भगवती सप्तेश्वर मंदिर, हरमल येथे रवळनाथ मंदिर, पालये भूमिका मंदिर कोरगाव, कमळेश्वर मंदिर, तुये भगवती मंदिर पार्से, खाजनगुंडो तुये भगवती मंदिर, पालिये साईबाबा मंदिर, धारगळ शांतादुर्गा मंदिर, दाडाचीवाडी मारुती मंदिर, धारेश्वर मंदिर, नागझर भेंडाळे येथे सातेरी महादेव मंदिर, हुतात्मा तुकाराम गावस स्मारक चांदेल, पत्रादेवी हुतात्मा स्मारक, तोरसे मंदिर, मोपा सातेरी माऊली मंदिर, उगवे माऊली मंदिर, वारकरी शांतादुर्गा मंदिर, खाजणे माऊली मंदिर, भटपावणी मार्गे माऊली मंदिर, पोरस्कडे असा प्रवास करत करत ही रॅली पेडणे येथील भगवती मंदिर येथे समारोहाच्या दिशेने पोहोचली. तिथे भव्य स्वागत करण्यात आले.