दुर्गादास गर्दे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच येथील कलाकारांमध्येही उत्साह संचारला आहे. कलाकारांची खाण असलेल्या डिचोलीतील कलाक्षेत्रातील 'राजा', निवृत्त कलाशिक्षक राजाराम परब यांनी पिंपळाच्या सुमारे ११ इंच पानावर एका बाजूने श्रीरामाची प्रतिकृती, तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराचे अविश्वसनीय असे चित्र रेखाटले आहे.
प्रारंभी हे चित्र पाहताना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, की ही अद्भुत कलाकृती पोस्टर कलरने साकारली आहे. त्यांनी साकारलेल्या या अनोख्या कलाकृतीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. परब यांनी पानावरील रंग दुसऱ्या बाजूला पसरू नये, यासाठीही विशेष लक्ष दिले. अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून त्यांनी काढलेले चित्र लक्षवेधी ठरत आहे.
...असे साकारले चित्र
या कलाकृतीसाठी पिंपळाच्या पानाची निवड करून पानातील क्लोरोफॉर्म पूर्णपणे काढावा लागतो. यासाठी हे पान महिनाभर कुजवावे लागते किंवा रासायनिक प्रक्रिया करून पारदर्शक जाळीदार बनवावे लागते. नंतर खरी कसोटी सुरू होते. कारण, जाळीदार पारदर्शक पानावर पोस्टर कलरने एका बाजूने चित्र काढल्यानंतर दुसऱ्या बाजूने चित्र रंगवताना पोस्टर कलर एकमेकांत मिसळण्याची शक्यता जास्त असते. पान वाटतेय हुबेहूब पिपळपान एवढे कलात्मकतेने रंगवले की, ते पाहताना हुबेहूब खरेच वाटते. चित्र रंगवणाऱ्याचे कसब सिद्ध होते.
गोव्यातील पहिलेच कलाकार...
कलाकार आपले सर्व कौशल्य यावेळी पणाला लावून जय श्रीराम म्हणत ही कलाकृती साकारतो. त्यावेळी फक्त दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' असे म्हणण्याशिवाय आपल्याजवळ आणखी काहीच राहत नाही, असे चित्र रंगवणारे राजाराम परब हे गोव्यातील कदाचित पहिलेच कलाकार असावेत. यापूर्वी परब यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता, त्यावेळी त्यांनी अटलजींच्या चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटले होते. त्यावेळी त्यांचे कौतूक झाले होते.