लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अपेक्षेनुसार उत्तर गोव्यात भाजपची उमेदवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाच बहाल करण्यात आली आहे. पक्षाच्या जाहीर झालेल्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाईक यांचे नाव आहे. सलग सहाव्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. या पहिल्या यादीत श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्याचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही निवडणूक जिंकल्यास त्यांचा दीर्घ काळ खासदार राहण्याचा आणि निवडणुका जिंकण्याचा विक्रम नोंद होणार आहे.
आपल्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा उत्तर गोव्यातून पक्षाची उमेदवारी दिल्याबद्दल नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर म्हटले आहे.
तोपर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण होईल
उमेदवारी निश्चित झाल्यामुळे आता प्रचार कार्याला सुरुवात करायला आम्ही मोकळे आहोत. लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण करण्याचा प्रयल केला जाईल, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यावेळी निवडणुकीत विजय मिळविण्याची शक्यता ही १०० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची जाणीव लोकांना आहे. तसेच आपण स्वतः केलेल्या कामाचीही लोक दखल घेतील, असेही ते म्हणाले.