पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह अन्य विविध मागण्यांसाठी कदंब कर्मचारी आंदोलन करीत आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी या कर्मचाऱ्यांना दिले.
पणजी येथील आझाद मैदानावर कदंब महामंडळाचे कर्मचारी २९ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, बुधवारी खासदार नाईक यांनी त्यांची भेट घेतली. व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला तुमची भेट घेण्यास उशीर झाला. मात्र मागण्यांची दखल घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामगार नेता राजू मंगेशकर म्हणाले, की सरकारने कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र आश्वासना नंतरही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सरकारने दिलेली नाही. सरकारला एकाच वेळी ही थकबाकी देणे शक्य नसल्यास ती हप्त्यांमध्ये दिली जावी अशी मागणी त्यांनी केली.