सदगुरू पाटील
पणजी : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) श्रीपाद नाईक यांना इफ्फीच्या समारोपावेळी व्यासपीठावर बोलविण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवले नाही. गोव्यात हा विषय चर्चेचा ठरला असून श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी या अन्यायाविरुद्ध प्रथमच गुरुवारी आवाज उठवला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी चित्रपट महोत्सव संचालनालयाला (डीएफएफ) शिष्टाचार शिकवावा, असा सल्ला सिद्धेश नाईक यांनी दिला आहे.
श्रीपाद नाईक हे स्वत: शांत व नम्र स्वभावाचे आहेत. मात्र दरवेळी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्य़ावेळी श्रीपाद नाईक यांची दखल आयोजक घेत नाही व राज्य सरकारही या विषयात हस्तक्षेप करत नाही हे सर्व गोमंतकीयांच्या लक्षात आले आहे. बुधवारी 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात पार पडला. देश-विदेशातील हजारो प्रतिनिधी आणि बरेच सिने कलाकार त्यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारामुळे गैरहजर होते. उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे त्यावेळी प्रेक्षकांमध्ये होते. व्यासपीठावर अनेक महनीय व्यक्ती व विशेषत: राजकारण्यांना बोलावून त्यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान केले गेले. मात्र एकदाही श्रीपाद नाईक यांना व्यासपीठावर बोलविले गेले नाही. याबाबत प्रेक्षकांमध्ये हळू आवाजात चर्चा झाल्यानंतर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. श्रीपाद नाईक यांना व्यासपीठावर एकदा तरी बोलवायला हवेच होते. चित्रपट महोत्सव संचालनालय व गोवा मनोरंजन संस्थेने चूक केली असे सावंत म्हणाले.
नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले की, यापूर्वी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या मंत्रीपदी स्मृती इराणी असतानाही श्रीपाद नाईक याना इफ्फीवेळी व्यासपीठावर बोलाविले गेले नव्हते. एकदा चुकून झाले असे म्हणता येते पण दरवेळीच असे घडू लागल्याने आपल्याला आवाज उठवावा लागला. चित्रपट महोत्सव संचालनालयाला शिष्टाचार कळण्याची गरज आहे.
दरम्यान, सिद्धेश नाईक यांनी आपल्या भावना ट्वीटरवरूनही व्यक्त केल्या आहेत. राठोड सर, प्लीज टीच प्रोटोकॉल टू युवर डीएफएफ इंडिया अशा शब्दांत नाईक यांनी संबंधितांचे लक्ष श्रीपाद नाईक यांच्याबाबत इफ्फी आयोजकांकडून झालेल्या अन्यायकारक चुकीकडे वळविले आहे. डीएफएफला स्वत:च्या देशातील केंद्रीय मंत्री ठाऊक नाहीत, असे सिद्धेश नाईक यांनी म्हटले आहे.