उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:42 PM2019-05-23T20:42:09+5:302019-05-23T20:48:44+5:30

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे.

shripad naik win in north goa | उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा

उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले.सत्तरी तालुक्याने तर भाजपाच्या पारड्यात हजारो मते टाकली. त्याचबरोबर डिचोली तालुक्यानेही मोठी साथ दिली.श्रीपाद नाईक पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांनी नाईक यांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला.

पणजी - उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुक्याने तर भाजपाच्या पारड्यात हजारो मते टाकली. त्याचबरोबर डिचोली तालुक्यानेही मोठी साथ दिली.

श्रीपाद नाईक पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांनी नाईक यांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच बाबूश मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे तिसवाडीत भाजपाची मते कमी होतील असे अनेकांना वाटले होते पण मते कमी झाली नाहीत. बार्देश तालुक्यात थोडी कमी झाली पण पेडणे, सत्तरी, डिचोली तालुक्यांमध्ये खूपच मते श्रीपाद नाईक यांना प्राप्त झाली. पर्ये मतदारसंघात भाजपाला 10 हजार मतांची आघाडी मिळाली. तो मतदारसंघ काँग्रेसचे प्रतापसिंग राणे यांच्या ताब्यात आहे, तिथे वाळपईपेक्षाही जास्त मतांची आघाडी भाजपाला मिळाली. वाळपईतही भाजपाने प्रचंड मते मिळवली पण मुस्लिम धर्मीय मतदारांनी मते दिली नाहीत असे दिसून येते. मंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सत्तरी व उसगावमध्ये भाजपाची मते वाढली. तसेच मये, डिचोली या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे राजेश पाटणेकर, प्रविण झाटय़े, अनंत शेट यांच्या प्रयत्नांमुळे भाजपाला प्रचंड मते प्राप्त झाली.

बार्देश व तिसवाडीच्या ख्रिस्ती धर्मीय मतदारांनी जास्त मते भाजपाला दिली नाही. ती मते काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्याकडे वळली. मात्र भंडारी समाजातील मतदारांनी व विशेषत: हिंदू बहुजन समाजाने काँग्रेसपेक्षा भाजपाला उत्तरेत जास्त पसंती दिली. त्यामुळेच प्रियोळ व थिवी या दोन मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी श्रीपाद नाईक यांची आघाडी 55 हजारांच्या पुढे पोहचली होती. मतमोजणी पूर्ण होण्यास रात्री बराच उशीर झाला. काँग्रेसचे उमेदवार चोडणकर हेही भंडारी समाजातील आहेत पण ते जास्त मते फोडू शकले नाहीत. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा उत्तरेत प्रभाव पडला नाही. शिवसेना व सुरक्षा मंचने उमेदवार उभे केले नव्हते. 2014 सालच्या निवडणुकीत भाजपाला उत्तरेत 1 लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी ती कमी झाली.

 

Web Title: shripad naik win in north goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.