पणजी : श्रीपाद नाईक यांनी वयोपरत्वे आता विश्रांती घ्यावी, असा सल्ला देत मांद्रेंचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी भाजपने जर संधी दिली तर उत्तर गोवा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
सोपटे यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, नव्या दमाच्या तरुण नेत्यांना संधी मिळायला हवी. श्रीपादभाऊंनी देशासाठी व गोव्यासाठी ४० वर्षे सेवा केली त्यांनी आता विश्रांती घेण्याची गरज आहे. आमच्यासारख्या तरुणांचे त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात त्यांचा केवळ ७१५ मतांनी पराभव झाला होता.
तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सोपटे बूथ सशक्तिकरण अभियानच्या निमित्ताने तसेच मोदी सरकारने केंद्रात नऊ वर्षे पूर्ण केली त्या निमित्ताने 'नौ साल बेमिसाल' अभियान अंतर्गत प्रमुख म्हणून उत्तर गोव्यात ठिकठिकाणी फिरले आहेत. संघटनेच्या कामासाठी उत्तर गोव्यातील २० मतदारसंघांपैकी सांताक्रुज व ताळगाव सोडले तर १८ मतदारसंघात ते फिरलेले आहेत.
श्रीपाद नाईक हे केंद्रात पर्यटन राज्यमंत्री असून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत.