लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : नोकरीसाठी पैसे दिल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित शिक्षक योगेश शेणवी कुंकळीकर याच्याकडून नोकरीच्या बहाण्याने दोन कोटी वीस लाख रुपये घेतलेल्या श्रुती प्रभू उर्फ प्रभुगावकर हिला मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. फोंडा तालुक्यात या प्रकरणी झालेली ही आठवी अटक आहे. श्रुती ही मूळ पैंगीण-काणकोण येथील आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगम बांदोडकर याने सोमवारी एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षक असलेल्या योगेश शेणवी कुंकळीकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांना त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासा दरम्यान योगेशने आणखी काही लोकांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासंदर्भात योगेशने चौकशीत त्याने ते पैसे पर्वरी येथील श्रुती प्रभू उर्फ प्रभुगावकार हिच्याकडे दिल्याचे कबूल केले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तिला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरा तिच्याविरुद्ध लूकआऊट नोटीससुद्धा जारी करण्यात आली.
मंगळवारी पहाटे संशयित श्रुतीला पर्वरी येथून अटक करण्यात आली. पैशांच्या बदल्यात नोकरी या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईक हिला सर्वप्रथम अटक केली. त्यानंतर अजित सतरकर व संदीप परब यांना अटक करण्यात आली, तर फोंडा पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला सागर नाईक याला अटक केली. त्यानंतर सुनीता पावसकर, दीपाली सावंत-गावस आणि योगेश कुंकळीकरला अटक करण्यात आली. आता श्रुती प्रभुगावकर हिचा समावेश उघड झाल्याने टक करण्यात आलेल्यांची संख्या आठ झाली आहे.
दीपश्रीला कोठडी
नोकरीसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात अगोदरच अटक करण्यात आलेल्या दीपश्री सावंत गावस हिची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. तिला पुन्हा एकदा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.