लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारी नोकऱ्या विक्री प्रकरणी अटक झालेली श्रुती प्रभुगावकर ही पूर्वी भाजप सदस्य होती. मात्र सध्या ती पक्षात नाही. पक्षाशी संबंधित कुणी अशा प्रकरणात आढळून आले तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सावईकर म्हणाले की, 'भाजपचे राज्यात ३.५ लाख सदस्य आहेत. त्यामुळे यापैकी कोणी एकाने काही चुकीचे केले असेल तर त्याचा अर्थ पूर्ण पक्ष बदनाम होऊ शकत नाही. मात्र, जर कुणी असे करताना आढळलेच तर अशा लोकांवर कारवाई करून त्यांना पक्षातून काढले जाईल. अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही. सरकारने पोलिसांना सरकारी नोकऱ्या विक्री प्रकरणी तपासाला पूर्ण मोकळीक दिली आहे.
अॅड. सावईकर म्हणाले, 'सरकारनेच पुढाकार घेऊन त्याचा पर्दाफाश केला. सरकारी नोकरी म्हणजेच सर्व, सुरक्षित भविष्य या समजातूनच नोकरी देण्याच्या नावाखाली काही लोक पैसे मागत आहेत. आतापर्यंत सरकारी नोकऱ्या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. मात्र, त्यांचा भाजप पक्षाशी कुठलाही संबंध नाही. या प्रकरणात भाजपचे पदाधिकारी गुंतल्याचा आरोप विरोधक करीत आहे. पण विरोधकांचे कामच आरोप करणे असून त्यात कुठलेही तथ्य नाही. कर्मचारी निवड आयोगाच्या स्थापनेमुळे नोकरभरती प्रक्रियेत आणखीन पारदर्शकता आली आहे. सरकारी नोकरी ही मेरिटच्या आधारेच मिळते.