पणजी: ‘आजारी आहेत याचा अर्थ काम करू शकत नाही असा नव्हे’ असा युक्तीवाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्य विषयीच्या याचिकेवर युक्तीवाद करताना गोव्याचे अॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात केला. या प्रकरणात युक्तिवाद संपले असून निवाडा राखून ठेवला आहे.
हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि एस. एम. बोधे यांच्यापुढे आले असता याचिकादाराच्या वकिलाने मुख्यमंत्र्यांच्या अनारोग्याचा प्रशासनावर परिणाम होत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री अनारोग्यामुळे फायली हाताळू शकत नाहीत. स्वाक्षरीही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातर्फे प्रशासकीय अधिकारीच स्वाक्षरी करून फायली पुढे पाठवितात असा दावाही करण्यात आला. यावर प्रतिवाद करताना अॅडव्होकेट जनरल लवंदे यांनी हा दावा फेटाळला. मुख्यमंत्री केवळ कार्यालयात जात नाहीत, परंतु ते फायली हाताळत आहेत असे त्यांनी सांगितले. आजारी आहे याचा अर्थ काम करू शकत नाहीत किंवा करीत नाहीत असा होवू शकत नाही हे सांगताना अॅप्पल फोनचे सहनिर्माते स्टीव्ह जॉब यांचे उदाहरणही त्यांनी दिले.
याचिकादारातर्फे सरकारचे दावे खोडून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासारखी परिस्थिती गोव्यात उद्भवली तर काय परिस्थिती निर्माण होईल? असा प्रश्नही याचिकादार ट्रॉजॉन डिमेलो यांच्या वकिलातार्फे उपस्थित करण्यात आला. या प्रकरणातील युक्तीवाद संपले असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे.