नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर अभिभाषणात मौन, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 08:47 PM2018-02-19T20:47:10+5:302018-02-19T20:47:21+5:30
नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे.
पणजी- नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून मौन राखले जात आहे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्टता दिसून येत नाही. काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्यच केलेले नाही, तर काही मुद्द्यांचा अगदी ओझरता उल्लेख करून विषय टाळला गेला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नाईक म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात सध्या ऐरणीवर आलेल्या ज्वलंत समस्यांच्या बाबतीत उल्लेख असेल, अशी अपेक्षा होती. परंतु जे जे महत्त्वाचे विषय होते त्यावर मौन राखले गेले. राज्यात प्रादेशिक आराखड्याचा मुद्दा हा सध्या गाजतो आहे. तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला लोकांचा विरोध आहे. कोळसा हाताळणी व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत मुरगावात अजूनही वातावरण भीतीचे आहे. या मुद्द्यांचा उल्लेख झालेला नाही.
मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणामुळे विधानसभेत हजर राहू शकत नसल्यामुळे एकूण कामकाजाचे दिवस मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहेत. केवळ ४ दिवसांचेच अधिवेशन ठरणार आहे. परंतु हे कमी करण्यात आलेले दिवस विधिमंडळपटूंना देण्यात यावेत. आता शक्य नसले तरी नंतरच्या अधिवेशनाचे दिवस वाढवून ते भरून काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयी बोलताना नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योग्य उपचार घेऊन लवकर बरे होवोत. तसेच उपचारांसाठी त्यांना विदेशात जरी नेण्याची गरज असेल तरी त्यांना नेण्यात यावे असे ते म्हणाले.