प्रदेश काँग्रेसचा मूक सत्याग्रह; राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याने पणजीत निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:53 PM2023-07-13T13:53:37+5:302023-07-13T13:54:39+5:30
यावेळी पक्षाच्या नेत्यांना तोडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने पणजी येथील आझाद मैदानावर बुधवारी (दि. १२) मूक सत्याग्रह केला. यावेळी पक्षाच्या नेत्यांना तोडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, पणजी मनपाचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, एल्वीस गोम्स व अन्य पदाधिकारी यावेळी हजर होते.
याविषयी बोलताना पाटकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असे भारत जोडो अभियान केले. त्यांचे हे अभियान यशस्वी झाले. या अभियानात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार तसेच उद्योगपती अदानी यांच्यातील व्यवहारांचा पर्दाफाश केला.
या आरोपांमुळे भाजप सरकार खवळल्याने त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात षडयंत्र रचून बनावट गुन्हा नोंद केला. सरकार त्यांना घाबरत असल्याने त्यांची लोकसभेतील खासदारकी अपात्र ठरवली. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून न्यायालयानेही त्यांच्याविरोधात नोंद झालेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. सदर प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळेच त्याविरोधात मौन सत्याग्रह केले जात आहे.
राज्यातील भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रशासन पूर्णपणे कोलडले आहे. सदर सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनले आहे. ते केवळ विरोधकांना टार्गेट करीत आहेत. पावसाळी अधिवेशनात विरोधक एकजुटीने या सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणार असल्याचेही पाटकर यांनी स्पष्ट केले.