पणजी : उत्तरेकडून शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोव्यात मासळी येते त्याचप्रमाणे दक्षिणेकडून कारवार, उडुपीहूनही येते. मात्र गेले काही दिवस गोवा सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आयात ठप्प झाली आहे. अधिकृत माहितीनुसार केवळ उडुपीहूनच रोज १५ ते २0 ट्रकांमधून सहा ते सात टन मासळी रोज गोव्यात येते मात्र गेले आठ दिवस ही आयात पूर्णपणे बंद आहे.
गोव्याच्या या मासळी आयात निर्बंधांचा कर्नाटकातील मासळी व्यापाºयांनाही फटका बसला आहे. आयात मासळीसाठी संबंधित राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी तसेच इन्सुलेटेड वाहनांनीच मासळीची वाहतूक करावी, अशा अटी गोवा सरकारने घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने पुरेसा अवधी दिलेला नाही, अशी मासळी व्यापाºयांचे म्हणणे आहे. तर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हा आरोप फेटाळताना पुरेसा अवधी दिल्याचा आणि आणखी मुदत देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उडुपी, कारवारहून मासळी गोव्यात निर्यात होऊ न शकल्याने तेथील स्थानिक बाजारपेठांमध्ये दर उतरल्याची माहिती मिळते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कर्नाटकातील मालपे येथील मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष सतीश कुंदर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
दरम्यान, सावंतवाडीचे आमदार तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विश्वजित यांच्याशी फोनवर संपर्क साधून आणखी दोन महिने मुदत द्यावी, अशी मागणी केली होती परंतु ती फेटाळून लावण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी गोव्याने आयात निर्बंधांवर फेरविचार केला नाही आणि सिंधुदुर्गातील मासळी अडविली तर गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. या इशाºयाचा गोव्यातील मंत्र्यांनी समाचार घेताना अशा धमक्यांना सरकार भीक घालत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.