काशिराम म्हांबरे
म्हापसा- कळंगुट मतदार संघातील हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररित्या डोंगराची तसेच झाडांची कापणी करण्यात आल्याचा दावा स्थानीक कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. या प्रकाराला मायकल लोबो यांनी विरोध केला असून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा प्रकार त्यांच्याच मतदार संघात घडला आहे.स्थानीक पंचायतीच्या सदस्य तसेच अधिकाऱ्या समवेत त्यांनी या भागाची पाहणी केली. केलेल्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डोंगर कापून या जागेत सुमारे ८ मिटर रुंदीचा रस्ता बांधण्यात आला आहे. तसेच २५० हून जास्त झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. कापलेल्या प्रत्येक झाडासाठी संबंधीतांकडून दंड वसूल करण्यात यावा तसेच भागाला पूर्वस्वरुप प्राप्त करुन देण्यात यावे अशी मागणी लोबो यांनी केली.
पर्यावरण नष्ट करण्यास सुरु असलेला हा प्रकार आपण वन मंत्री तसेच नगर नियोजन विश्वजीत राणे यांच्या नजरेला आणून देणार आहे. घडलेल्या प्रकारावर योग्य ती कारवाई करण्यास पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच योग्य प्राधिकरणीला पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली जाणार असल्याचेलोबो म्हणाले.
परिसरात सुरु असलेले रस्ता बांधणीचे काम तातडीने बंद करण्याचा आदेश देण्याची सुचना स्थानीक हडफडे-नागवा पंचायतीला दिली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. आपल्या परिसरात घडत असलेल्या अशा प्रकारावर लोकांनी दक्षता बाळगण्याची गरज असून डोंगर कापणीला तसेच झाडांच्या कत्तलीला विरोध त्यांचे संरक्षण करण्याची गरज मायकल लोबो यांनी व्यक्त केली.