पणजी : गोमेकॉत रुग्णांना जमिनीवर झोपवून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे सरकारला मान्य नाही. या प्रकरणी आयोगाने बजावलेल्या नोटिसीमुळे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा खवळले आहेत. या नोटिसीला योग्य ते उत्तर देऊ, असेही डिसोझा यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. रुग्णांना औषधपाणी दिले नसते किंवा उपचार केले नसते तर मानवी हक्कांचा भंग झाला असे म्हणता आले असते; परंतु जमिनीवर झोपविले म्हणून हक्कांचे उल्लंघन झाले हे मानायला आम्ही तयार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोमेकॉत येणारे रुग्ण मोफत उपचार मिळतात म्हणून बरे झाले तरी घरी जायला बघत नाहीत. बाळंतिणींच्या बाबतीत तर इस्पितळातून डिसचार्जसाठी शुभ दिवस पाहिला जातो. काहींच्या बाबतीत धर्माची बंधने आहेत हे मान्य आहे. रुग्णांना देण्यासाठी खाटाच शिल्लक नसतील तर त्यांना परतवून लावावे काय, असा उलट सवाल डिसोझा यांनी केला. ते म्हणाले, जमिनीवर झोपवावे लागले तरी रुग्णांना गाद्या दिल्या जातात. त्यांची योग्य ती शुश्रूषा केली जाते. गोमेकॉवर रुग्णांचा ताण नेहमीच असतो. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकमधून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. दिवसेंदिवस इस्पितळ अपुरे पडत आहे. सुविधा वाढवायच्या तरी कीती? आरोग्याच्या बाबतीत सर्वेक्षणात गोव्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधांना कोणालाही नावे ठेवता येणार नाहीत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
रुग्ण जमिनीवर झोपल्याने मानवी हक्क उल्लंघन नाही
By admin | Published: September 07, 2015 3:17 AM