पणजी : केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत मंगळवारी थोडी सुधारणा झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी प्रकृती सुधारल्याचे नाईक यांच्या नातेवाईकांनी सांगितले. नाईक यांची मंगळवारी दुसऱ्यांदा कोविड चाचणी केली गेली.
श्रीपाद नाईक यांची पहिली कोविड चाचणी रविवारी केली गेली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. श्रीपाद नाईक यांची ऑक्सीजन पातळी सोमवारी खूप कमी झाली होती. त्यामुळे सरकारी पातळीवरही चिंता व्यक्त होत होती. नाईक यांना अन्य कोणता आजार नाही पण कोविडमुळे त्यांच्या फुफ्फूसाला संसर्ग झाला. त्यांना त्यामुळेच त्रस होऊ लागला. त्यांना तूर्त उपचारांसाठी दिल्लीला नेण्याची गरज नाही, असे मणिपाल इस्पितळाच्या डॉक्टरांनी सांगितले. कारण एम्सच्या डॉक्टरांचे पथक मणिपाल इस्पितळाच्या संपर्कात आहे. पथकातील एक डॉक्टर गोव्यातच थांबले असून ते नाईक यांच्यावर उपचारही करत आहेत. केंद्रीय मत्री नाईक हे गेले अनेक दिवस मणिपाल इस्पितळात आहेत. त्यांच्या पत्नीलाही कोविडची लागण झाली होती पण त्या ठिक आहेत. त्यांना कोविडची लक्षणो दिसत नाहीत.
एम्सचे पथक गोव्यात आले व या पथकाने मंगळवारी बांबोळीच्या गोमकॉ इस्पितळाला भेट दिली. कोविड रुग्णांसाठी तिथे जे तीन विभाग स्थापन केले गेले आहेत, त्याची पाहणी पथकाने करून आढावा घेतला. तसेच मडगावच्या ईएसआय इस्पितळालाही पथकाने भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत एम्सच्या पथकाचे आभार मानले. एम्सच्या पथकाचे मार्गदर्शन गोव्यात कोविड व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.