राजधानी पणजी शहराने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पूर्ण पराभव केला आहे. गोव्यात नॅशनल गेम्स होत आहेत. याचा मुख्यमंत्री सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना प्रचंड अभिमान. अर्थात अभिमान असायलाच हवा. जिथे प्रचंड पैसा खर्च करण्याचे निमित्त मिळते, तिथे तर प्रत्येक कार्यकर्त्याला गर्व वाटायला हवा. छाती फुगायला हवी. अकरा हजार क्रीडापटूंना गोवा सरकार हाताळणार आहे. 'शो मस्ट गो ऑन', असे म्हणत कोट्यवधी रुपये खर्च केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २६ रोजी गोव्यात येतील. ते फातोर्डा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील. खरे म्हणजे सावंत मंत्रिमंडळाने पंतप्रधानांना राजधानीत फिरून आणायला हवे. खड्डेमय रस्ते, धुळीचे साम्राज्य, एकदा काम करून झाल्यानंतरही पुन्हा विविध यंत्रणांनी फोडून ठेवलेले रस्ते, रस्त्याच्या कडेलाच उघड्या गटारांमधील वायर्स, अत्यंत कसरत करत वाहन चालविणारे वाहन चालक, मध्येच खाली पडणाऱ्या दुचाकी वगैरे चित्र गोवा सरकारने जर आदरणीय पंतप्रधानांना दाखवले, तर स्मार्ट सिटी म्हणजे काय असू शकते, याची कल्पना पूर्ण देशाला येईल. सोबत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना घ्यायलाच हवे. राज्याचे मुख्य सचिव गोयल हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रमुख आहेत. ते कधी पणजीत कामांच्या पाहणीसाठी फिरतच नाहीत.
रायबंदर ते सांतईनेज पणजीपर्यंत जर पंतप्रधानांनी फेरफटका मारला, तर गोव्याचे राज्यकर्ते व आयएएस अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कसे मातेरे करू शकतात, हे आदरणीय मोदींना कळून येईल. मोन्सेरात यांचे पुत्र रोहित है पणजीचे महापौर आहेत. सर्व नगरसेवकांनाही पणजीतील भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत घ्यावे. नगरसेवकही स्मार्ट सिटी कामांवर प्रचंड नाराज आहेत. सल्लागार बदलण्याची मागणी पूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी केली होती. काही कामे निकृष्ट दर्जाची होतील, असे पावसाळ्यापूर्वी ते म्हणाले होते. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये अनेक सरकारी खाती व विविध यंत्रणा गुंतलेल्या आहेत; पण त्यांच्यात समन्वय नाही. कोणती यंत्रणा कोणते काम करतेय, हे एकमेकाला ठाऊक नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर जर आज पणजीच्या आमदारपदी असते, तर त्यांनी समन्वयासाठी सातत्याने बैठका घेतल्या असत्या. आता वरिष्ठ स्तरावर बैठकाच होत नाहीत.
आमदार मोन्सेरात यांना संबंधित यंत्रणा विश्वासातही घेत नसावी असे वाटते. पहिल्या 'इफ्फी' वेळी कमी वेळेत साधनसुविधा निर्माण करण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री पर्रीकर हे रात्री एक वाजेपर्यंत धावपळ करायचे. सातत्याने पर्रीकर फिल्डवर असायचे. त्यामुळे आयनॉक्स मल्टिप्लेक्स उभा राहिला, पाटो येथील समांतर पूल उभा राहिला. कला अकादमीचे नूतनीकरण झाले होते. आता स्मार्ट सिटी म्हणजे नको झालेले मूल अशी स्थिती वाट्याला आली आहे. रायबंदरमध्ये चला किंवा साइनेजची दुर्दशा पाहा. वारंवार खोदाईच सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने चालताही येत नाही. फूटपाथ बुजून गेले.
पणजी व ताळगावमध्ये आता कुत्र्यांना स्मार्ट करण्याची मोहीम सुरू झाली आहे. पणजी व ताळगावमध्ये पाळीव कुत्र्यांना मायक्रोचीप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. चीपमध्ये मालकाचे नाव, मोबाइल क्रमांक असेल. शिवाय लसीकरण, नसबंदी केली की नाही, याची माहिती चीपमध्ये असेल. चीप त्यासाठी स्कॅन करावी लागेल, एकंदरीत पणजी व ताळगावमधील कुत्रे तरी आता स्मार्ट होत आहेत, असे म्हणूया रस्ते किंवा शहर स्मार्ट झाले नाही, तरी कुत्र्यांची स्थिती सुधारतेय हेही नसे थोडके, पणजीत आतापर्यंत ८६ कुत्र्यांना मायक्रोचीप बसवली.
आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी जाहीर केल्यानुसार ताळगावमध्ये कुत्र्यांना मायक्रोचीप लावण्याचे काम तीन ठिकाणी चालेल. त्यानंतर सांताक्रूझ मतदारसंघातही मायक्रोचीप मोहीम सुरू होईल. म्हणजे आपल्याही भागात कुत्रे स्मार्ट होतील याविषयी आमदार रुदोल्फ फर्नांडिस यांना आनंद वाटायला नको काय? मध्यंतरी ताळगावमध्ये अतिहिंसक कुत्र्याने दोन मुलांवर हल्ला केला. विदेशी जातीच्या अतिहिंसक कुत्र्यांवर बंदी लागू करावी, असे मुख्यमंत्री सावंत यांचे भव्यदिव्य स्वप्न आहे. हे स्वप्न स्वयंपूर्ण गोव्याहून मोठे आहे. आता बंदी कधी लागू होते, ते पाहूया.