नारायण गावस
पणजी: पणजी राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामाचे कारनामे सुरुच आहे. शुक्रवारी रात्री सांतीनेज येथील एक महिला खोदलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाली तसेच आज जुन्या सचिवालयाच्या मागे खड्ढ्याच्या बेरीगेटस्ला धडकून कारचे मोठे नुकसान झाले. प्रत्येक दिवशी स्मार्ट सिटीच्या या बेजबाबदार कामामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटीच्या खोदलेल्या ठिकाणी बेरीगेटस् चुकीच्या ठिकाणी लावण्यात आल्याने कारचे आदळून नुकसान झाले. त्यांनी याविषयी कंत्राटदाराला जबाबदार ठेऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमांद सावंत मंत्री बाबूश मोन्सेरात तसेच महापौर राोहित मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार पणाच्या कामाची दखल घेतली होती. काही दिवस यामुळे नियोजनानुसार काम करण्यात आले. पण आता पुन्हा बेजबाबदार काम सुरु केले आहे. एका बाजूने ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची धावपळ यामुळे घाई गडबडीत काम केले जात आहे. रस्त्याच्या बाजूला कुठेच फलक तसेच बेरीगेटस् नसतात त्यामुळे वाहतूकदारही गोंधळात सापडतो. तसेच एकाच वेळी अनेक रस्ते खोदले जात असल्याने वाहन चालकांना गाडी चालविणे कठीण झाले आहे.
राजधानी पणजीत सध्या लोकोत्सव, मत्स्यत्सोव व अन्य विविध महोत्सव सुरु आहेत. यामुळे सायं. वेळी शहरात मोठी गर्दी उसळते. तसेच पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागात वाहन चालकांच्या रांगा लागत असतात. गेली अनेक वर्षे पणजीकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पणजीत अनेक दुकानदारांना याचा फटका बसला आहे. सर्वत्र धूळ तसेच मातीचे ढिगार आहेत. अनेक वाहनांची मोडतोडही या खराब कामांमुळे झाली आहे.