पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: शहरातील 'स्मार्ट कामांची' उद्या सोमवार १ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायधीश पाहणी करणार आहेत. त्यामुळे या कामांमुळे होणारे धूळप्रदुषण रोखण्यासाठी स्मार्ट सिटीची लगबग सुरु झाली आहे.
पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या कामांसाठी वारंवार रस्ते खणले जात असल्यानेही त्या परिसरातील व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. स्मार्ट सिटीची बेशिस्तपणे कामे केली जात असल्याने एका युवकासह तीन जणांचा जीव गेल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे.या कामांमुळे पणजीवासियांची प्रचंड गैरसोय होत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी करुन पणजीच्या दोन नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
या याचिकांच्या पार्श्वभूमीवर न्यायधीश ही पाहणी करतील. धूळ प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या ठिकाणी कामे सुरु आहेत, तेथे दिवसांतून दोन वेळा पाणी शिंपडणे, रस्त्याची नियमितपणे साफसफाई करणे आदी पावले स्मार्ट सिटीने उचलली आहे. कंत्राटदार एजन्सी मेसर्स बागकिया, मेसर्स एमव्हीआर व मेसर्स बन्सल यांच्यावरही स्मार्ट सिटीने जबाबदारी दिली आहे.