पणजी - कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसगाडीच्या इंजिनातून अचानक धूर निघाल्यामुळे एकच गोंधळ उढाला. बांबोळी येथे हा प्रकार घडला.सकाळी साडेसातच्या सुमारास आल्तिनोहून कुज्जिरा येथील शाळा समुहातील विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या कदंब बसमधून बांबोळी येथे पोहोचल्यावर अचानक धूर सुटला. धूर इंजनमधून येत होता. प्रसंगावधान राखून बस ड्रायव्हरने बस बाजुला उभी केली व त्वरित सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून खाल उतरविले. गाडी पूर्णपणे थंड होवून धूर बंद झाल्यानंतर तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेपर्यंत नेऊन विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. तसेच दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी नेताना गाडी बदलून नेण्याची खबरदारीही या जबाबदार चालकाने घेतली. दरम्यान वारंवार घडणाऱ्या कदंब बसला आग लागण्याच्या प्रकारांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात अधिक चिंता ही शाळकरी मुलांच्या पालकांना लागून राहिली आहे. यापूर्वी बांबोळीलाच घडलेल्या आणखी एका दुर्घटनेत प्रवाशांना घेऊन जाणारी कदंबची बसगाडी जळून खाक झाली होती. त्यानंतर अशीच घटना आगशी येथे घडली होती. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाºया बसगाड्या या स्वयंचलीत दरवाजाच्या असणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. कारण बसला आग लागली तर स्वयंचलित यंत्रणे जळाली तर दरवाजा खुला होण्यास अडचण होते.
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या कदंब बसमधून धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:12 PM