वास्को: दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या शौचालयात लपवून ठेवलेल्या तस्करी सोन्याची तीन बिस्किटे कस्टम विभागाने रविवारी (दि. १५) कारवाई करून जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्किटे 2 किलो ९७६ ग्राम वजनाची असून त्यांची एकूण किंमत १ कोटी ११ लाख ५८ हजार ८८४ रुपये आहे. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने रविवारी केलेली ही कारवाई या आर्थिक वर्षातील तस्करीच्या सोन्याची सर्वांत मोठी कारवाई आहे.
रविवारी दाबोळी विमानतळावर दुबईहून उतरलेल्या विमानात (एआय ९९४) तस्करीचे सोने लपवण्यात आलेले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या विमानात तपासणीला सुरवात केली. दाबोळी विमानतळावर उतरलेले हे विमान नंतर येथून प्रवाश्यांना घेऊन बंगळूरला जाणार होते. सदर विमान बंगळूरला जाण्यापूर्वी यात कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली असता विमानातील शौचालयात एक पिशवी लटकवून ठेवल्याचे अधिका-यांच्या नजरेस आले. सदर पिशवी कस्टम अधिका-यांनी ताब्यात घेऊन तपासणी असता त्यांना यामध्ये तीन सोन्याची बिस्किटे असल्याचे निदर्शनास झाले.
कस्टम अधिका-यांनी त्वरित सदर विमानात प्रवास करणा-या प्रवाश्यांना हे सोने कोणाचे आहे, याबाबत विचारपूस केली असता या सोन्यावर कोणीही दावा केला नसल्याची समजले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याच्या एका बिस्किटाचे वजन ९९२ ग्राम असून तीनही सोन्याच्या बिस्किटांचे एकूण वजन २ किलो ९७६ ग्राम असल्याची माहिती सांगण्यात आली. या सोन्यावर कोणीच दावा केला नसल्याने १९६२ च्या कस्टम कायद्याखाली सदर सोने जप्त करण्यात आल्याची माहिती विभागातील सुत्रांनी दिली.
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर राजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली आहे. विमानातील शौचालयात लपवून आणलेले हे तस्करीचे सोने कुठे नेण्यात येत होते, ते आणण्यामागे कोणाचा हात आहे अशा विविध गोष्टीबाबत कस्टम अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.