पणजी : हळदोणा येथील युवकाचा मृतदेह बेवारस असल्याचे ठरवून गोमेकॉच्या शवागरातून नेऊन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणात गोमेकॉतील डॉक्टरांसह आरोग्यमंत्री विश्वजित राणे जबाबदार आहेत. त्यामुळे राणे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थेच्या तारा केरकर यांनी केली. तसेच गोमेकॉतून अशाच बेवारस मृतदेहाच्या अवयवयांची तस्करी खासगी हॉस्पिटलांना केली जाते. जानूझ पावेल गोन्साल्वीस याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्याचे अवयव परस्पर विकल्याचा आरोपही त्यांनी केला.
पणजीत रविवारी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी अॅन्ड्रिया परेरा या उपस्थित होत्या. तारा केरकर म्हणाल्या, गोमेकॉत अनेक घोटाळे सुरु असून या मृतदेहाची विल्हेवाट हे याच घोटाळ्याचा एक भाग आहे. गोमेकॉतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हळदोणा येथील जानूझ पावेल गोन्साल्वीस (२४) या युवकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावताना मामलेदारांचे पत्र व पोलिसांची उपस्थिती अनिवार्य असते. जानूझच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना हे सोपस्कार पूर्ण केले का? असा प्रश्न त्यांनी मांडला.
गोमेकॉतील सुरु असलेल्या या घोटाळ्यांविषयी संबंधीत डीन व मंत्री राणे यांना पूर्वकल्पना आहे. त्यांच्या आधारामुळेच हे प्रकार सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावताना अधिकाऱ्यांना २४ वर्षीय युवकाचा व ४५ वर्षीय इसमाच्या मृतदेहात फरक कळत नाही, हे लाजीरवाणी गोष्ट आहे. अशाच प्रकारे गोमेकॉतून आतापर्यंत कितीजणांना फसविण्यात आले असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो, असेही केरकर म्हणाल्या.