ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २१ : केवळ संशयावरून मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याच्यासाठी आणि सुतावरून स्वर्ग गाठण्यात पोलिसांचे खरे कसब पणाला लागते. परंतु या ठिकाणी पोलिसांना धोक्याची सुचना देणारे इमेल पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही त्या गोव्याच्या पोलीस खात्याच्या कार्यक्षमता व कार्यतत्वपता याविषयी काय बोलावे? महाराष्ट्र व गोव्यातील लोकांना लाखोंचा गंढा घालून पळालेल्या आॅल ब्रँड प्रमोशन कंपनी विशयी सावधानतेचा इशारा देणारा इमेल पोलिसांना एका नागरिकाकडून पाठविण्यात आला होता, आणि त्या इमेलची पोलिसांनी दखल घेतलीच नाही अशी माहिती आता उघडकीस आली आहे.
आॅल ब्रँड प्रमोशन नावाच्या एका कंपनीकडून गोमंतकियांना मोठी आमिषे दाखविणारी पत्रके वाटली जात आहेत. २५ हजार रुपये अनामत ठेऊन आपल्या वाहनांवर कंपनीच्या जाहिरातीचे स्टिकर चिकटवा आणि प्रतीमहिना ९ हजार रुपये कमवा अशी ती जाहिरात आहे. या कंपनीचे कार्यालय पाटो पणजी येथे आहे अशी सविस्तर माहिती देणारा इमेल सायबर गुन्हा विभागाच्या पोलिसांना फोंडा येथील व्यक्तीने पाठविला होता. पोलीसांकडून याची कबुलीही देण्यात आली आहे. या इमेलची दखल घेऊन पोलिसांनी तत्परतेने या कंपनीची खबर घेतली असती तर ३०० गोमंतकियांची झालेली लक्षावधी रुपयांची फसवणूक टळली असती. परंतु पोलिसांनी ही माहिती गांभिर्याने घेतली नाही.
पोलीसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण सायबर गुन्हा विभागाच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे सायबर विभागाने हा इमेल गुन्हा अन्वेषण विभागाला पाठविला. गुन्हा विभागाचा एक पोलीस उपनिरीक्षक पाटो येथे जाऊन आॅलब्रँड प्रमोशनच्या कार्यालयाजवळ गेला होता आणि कार्यालयाचे दार बंद असल्यामळे परत फिरला होता असा दावा आता या विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात हा उपनिरीक्षक केव्हा गेला होता आणि एकदा बंद दार दिसल्यामुळे पुन्हा तेथे का गेला नाही, तेवढ्यावरच चौकशी थांबली कशी हे प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयास्पद काहीही दिसल्यास पोलिसांना माहिती द्या असे आवाहन पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक करीत असतात. त्यासाठी हेल्पलाईनही उपलब्ध करून देण्यात आली. लोकांनी त्याला प्रतिसाद देताना गोपनीय माहिती पोलिसांना दिली तरी त्याचे फलित काय हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मेरशीतील दुहेरी खुनाच्यावेळीही...नागरिक आपला जीव धोक्यात घालून गोपनीय माहिती पोलिसांना पुरवितात आणि ही माहिती घेऊन पोलीस झोपा काढतात हे काही आजचे चित्र नसून यापूर्वी मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणातही पोलिसांची अशीच वृत्ती आढळून आली होती. बिल्डरने आपल्या कामगाराचा खून करून त्याला आपल्या घरासमोरील जमिनीत पुरून टाकल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर त्यावेळचे जुने गोवेचे पोलीस निरीक्षक देवेंद्र गाढ यांनी एक फेरफटका मारून ड्युटीची औपचारिकता बजावली होती. परिणामस्वरूप या बिल्डरने नंतर त्या कामगाराच्या पत्नीलाही ठार मारून तिच्या मुलांनाही मरायला जंगलात सोडून दिले होते.