लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणेकरांनो राजकारण्यांच्या नादी लागला, तर कच्चा आराखडा पक्का व्हायला वेळ लागणार नाही. सरपंच, आमदारसुद्धा भविष्यात बिगर गोमंतकीयच निवडून येतील, ही एक धोक्याची घंटा आहे, असा इशारा स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी दिला.
त्यामुळे स्थानिकांनी संघटित होऊन लढा द्यावा. राजकीय बळावर पेडवासीयांमध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न करू नये. पेडणे तालुक्यातील तब्बल १ कोटी ४४ लाख ७७ हजार ६८३ चौरस मीटर जमीन नवीन झोन आराखड्यात कृषी जमिनीचे सेटलमेंट झोन म्हणून रूपांतर केले. त्यामुळे स्थानिकांत खळबळ माजली असून, शांत असणारे पेडणेवासीय सावध होऊन जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बैठका, ग्रामसभांमध्ये ठराव घेउन या आराखड्याला विरोध करीत आहेत.
झोन का बदलला?
पेडणे तालुक्यातील एकाही नागरिकाने, एकाही सरपंचाने जमीन रूपांतर ठराव किंवा मागणी करणारे निवेदन सरकारला सुपूर्द केले नाही. मात्र, सरकारने ज्या पद्धतीने पेडणे तालुक्यातील एक कोटीपेक्षा जास्त चौरस मीटर जमीन सेटलमेंट झोनमध्ये दाखवून एक नवीन वादळ उठविले आहे.
लोकांना गृहित धरू नका: शहापूरकर
आमदार जीत अरोलकर यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे चर्चा केली आणि लोकांचे प्रश्न, लोकांचे विषय, लोकांना हवा तसा बदल करून देणार असल्याचेही जाहीर केले. टीसीपी मंत्र्यांनी आराखडा रद्द होणार नाही, असेही पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.