लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : काही लोकांच्या सावलीतही राहण्याची माझी इच्छा नाही. कारवाई होणे हा वेगळा विषय आहे. सभापतिपदावर असताना मी सर्वांना शंभर टक्के मान सन्मान मिळेल. पक्ष, सरकारला किंवा कार्यकर्त्यांना अशा कुणाचीच हानी होणार नाही याची काळजी घेतो. संविधानिक पद असल्याने प्रत्येक मंत्र्याने, आमदाराने पदाला मान दिलाच पाहिजे, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमानिमित्त येथील रवींद्र भवनमध्ये आले असता तवडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दरवर्षी मी लोकोत्सव आयोजित करतो. मागील वर्षी दोन लाख लोक आले होते. यावर्षीही अशीच संख्या अपेक्षित आहे. सगळ्या समाजांना आपण समजून घेतले पाहिजे. नवरा- बायको, भावा-भावामध्ये भांडणे होत असतात. गावामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्येदेखील भांडणे होत असतात. माणूस म्हटला की, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे त्यांची आणि माझी विचारसरणी वेगळी आहे. स्पर्धेचा यामध्ये विषयच नाही. त्यांना हवे तसे काम व विधाने ते करतात. ते त्यांना करू द्या.'
ते तात्त्विक मतभेद
दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांच्याशी असलेल्या मतभेदाविषयी पत्रकारांनी विचारले असता सभापती तवडकर यांनी त्यांच्याशी काही तात्विक मतभेद असल्याचे मान्य केले.
हे शक्तिप्रदर्शन नव्हे
सभापती तवडकर म्हणाले, 'रथयात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन नव्हे. मी जेव्हा रॅली काढतो त्या रॅलीला साथ देण्यासाठी आम्ही बाहेर पडलो पाहिजे, अशी लोकांमध्ये भावना आहे. महिनाभरापूर्वी हा विषय लोकांसमोर ठेवला आणि तो सर्वांना भावला. त्या दृष्टिकोनातून ही रॅली पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आज, यात्रेचा समारोप काणकोण येथे होणार असून, केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री दुर्गादास उड़की उपस्थित राहणार आहेत. येथे कुठलेच शक्तिप्रदर्शन दाखविण्याचा विषयच नाही.'
सांगू शकत नाही, पण अनुभव येतो
'आतापर्यंत तीन प्रकरणे झाली. त्यामध्ये एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्याच्याशी माझा काहीच संबंध नव्हता. त्यामध्ये मला गुंतवून एकेरी उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर एखादा मंत्री जेव्हा भाषण करतो, तेव्हा माझ्या मते त्याने शिष्टाचार सांभाळायला हवा. पण, तसे प्रत्यक्षात घडलेले नाही. त्याविषयी मी पक्षाकडे तक्रार केली आहे. काही अराजकीय वृत्तीच्या शक्ती वावरत आहेत. याविषयी या पदावरून सांगू शकत नाही. पण, आम्हाला अनुभव येत असतो. अशा शक्ती येणाऱ्या काळात संपूर्ण समाजासाठी धोकादायक आहेत, अशी टीकाही तवडकर यांनी केली.