पणजी : माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांची पीडीएच्या आधारे सरकारमध्ये एन्ट्री होत असल्याने बाबूशचे राजकीय शत्रू असलेले मनोहर पर्रीकर सरकारमधील काही मंत्री अस्वस्थ बनले आहेत.
नियोजन आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पीडीएच्या स्थापनेला समाजाचे काही घटक सातत्याने विरोध करत आले आहेत. भाजपानेही विरोधात असताना पीडीए म्हणजे पीडा अशा शब्दांत संभावना केली होती. आता भाजपाप्रणीत आघाडी सरकारने दोन नव्या पीडीए स्थापन कराव्यात असे ठरवल्यामुळे आणि त्यापैकी एका पीडीएचे चेअरमनपद हे मोन्सेरात याना दिले जाणार असल्याने भाजपाच्या काही मंत्र्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये सध्या एक पीडीए आहे. सरकार आता उत्तर गोव्यात ग्रेटर पणजी आणि मोपा अशा दोन नव्या पीडीए स्थापन करत आहे. सरकारच्या राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मते गोव्यातील ज्या भागांचे शहरीकरण झाले आहे त्या भागांचा समावेश पीडीएंमध्ये व्हायला हवा. मात्र सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीतील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ही भूमिका मान्य नाही. तसे असेल तर गोव्यातील फोंडासह अनेक भागांचे शहरीकरण झाले असून तिथेही पीडीए स्थापन करा अशी उपहासात्मक मागणी मगोपने नुकतीच केली आहे. मंत्री सरदेसाई यांनी सांगितले की, लोकभावनेचा आम्ही आदर करतो. त्यामुळेच सरकार गावांचा समावेश नव्या पीडीएंमध्ये करत नाही. ग्रेटर पणजी ह्या नव्या पीडीएमध्ये शहरी भागांचा म्हणजेच ताळगाव पठार, बांबोळी पठार व कदंब पठाराचा समावेश केला जाईल. मोपा येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने त्या भागाचा विकास हा नियोजनबद्ध व्हावा म्हणून पीडीए स्थापन करावी लागते.
दरम्यान ग्रेटर पणजी पीडीएचे चेअरमनपद माजी मंत्री मोन्सेरात यांना दिले जाईल या जाणीवेने भाजपचे काही आमदार व मंत्री अस्वस्थ आहेत. माजी आमदार सिद्धार्थ कुंकलेकर हे देखील खूष नाहीत पण सध्या पर्याय नाही असे काही नगरसेवकांनी सांगितले. भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो हेही नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यापूर्वी लोबो यांच्याशी चर्चा केली आहे. मोन्सेरात या महत्वाकांक्षी नेत्याचा गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच पराभव झाला. त्यामुळे सत्तेच्या सर्व लाभांपासून त्याना दूर रहावे लागले. भाजपच्या काही मंत्र्यांचे बाबूशशी शत्रूत्व असून ते बाबूशच्या या स्थितीबाबत समाधानी होते पण आता आघाडी सरकार चालवताना मुख्यमंत्री पर्रीकर याना तडजोड करावी लागत आहे व तडजोडीपोटी मोन्सेरात याना नव्या पीडीएचे चेअरमनपद द्यावे लागणार आहे. चेअरमनपदामुळे मोन्सेरात पुन्हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ होतील व राजकीयदृष्ट्या ते पुन्हा सक्रिय होतील या जाणीवेने काही मंत्री खूप नाराज झाले आहेत.