पणजी: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला पाठींबा देऊन आपण चूक केली की काय अशा प्रकारचा प्रश्न पडत असल्याचे विधान केलं होत. यावर विरोधकांमधील काहीजण सैरभैर झाली आहेत पण सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.
प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याच्या जनतेला सरकारचे आवडू लागले आहे. काहीजणांना ते पाहवत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत व काहीही विधाने करतात. काहीजणांना सरकारचे काम ब:यापैकी चाललेय हे पाहवत नाही. जे काहीही विधाने करतात, त्या विधानांची आम्ही काळजी करत नाही. आमच्याकडे सत्तावीस आमदारांचे संख्याबळ आहे. शिवाय तिघेजण सरकारला पाठींबा देतात.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असलेले मंत्री गुदिन्हो म्हणाले, की सरकारची प्रगती पाहून काहीजण डिस्टर्ब झालेले आहेत. कोण डिस्टर्ब झालेत, त्यांची नावे मी घेत नाही, कारण लोकांना ते ठाऊक आहे. काहीही विधाने विरोधक करतीलच. ती विधाने राजकीय स्वरुपाची आहेत. विरोधक जे काही बोलतात, ते ऐकले की, सरकार योग्य प्रकारे काम करतेय हे स्पष्ट होतं असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी प्रथम पर्रिकर यांच्या सरकारला व त्यानंतर सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देऊन आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न सतत पडत असल्याचे विधान केले होते. तसेच विश्वासघाताचे जे काही बीज आहे, ते या दोन प्रश्नांमध्ये आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्लीहून मिळतील, नव्या वर्षी तरी निश्चितच मिळतील असेही सरदेसाई म्हणाले. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की सरदेसाई काय बोलले त्यावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र मी एवढे निश्चित सांगतो की, आमचे सरकार चांगले काम करत आहे. आमचे सरकार स्थिर आहे व विधानसभेचा उर्वरित कार्यकाळही पूर्ण करण्याचा विश्वास असल्याचा प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.