पणजी : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी गोव्यात विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने सोनियाजींनी कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी विश्रांतीसाठी जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोनियाजी पुत्र राहुल यांच्यासह गोव्यात दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोनियाजी आणि राहुलजी यांचा हा गोवा दौरा पूर्ण खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येते. गोव्यात काही दिवस सोनियाजींच्या मुक्काम राहणार आहे. छातीत झालेला संसर्गामुळे गेल्या जुलैमध्ये सोनियाजी इस्पितळात दाखल होत्या. दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांना संसर्ग झाला होता आणि त्यांचा दमा बळावला होता. दिल्लीपासून दूर कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता.
बिहार निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण झाल्यानंतर आत्मचिंतनाची गरज असताना सोनियाजींना आरोग्याच्या कारणास्तव विश्रांतीसाठी गोव्यात यावे लागले आहे. सोनियाजींना ३० जुलै रोजी दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर त्या घरी आल्या आणि १२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय चेकअपसाठी विदेशात गेल्या. त्यावेळीही त्यांच्यासोबत राहुलजी होते. संसद अधिवेशन १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत झाले. हे अधिवेशनही सोनियाजी तसेच राहुलजींना चुकले होते.