अजित रॉयवास्को: दक्षिण गोव्यातील सडा येथील अपरजेटी भागात असलेल्या ‘गणेश बेंन्झोप्लास्ट’च्या टाकीत नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता खाली करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवण्यास सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी (दि.१३) दक्षीण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी येथे येऊन टाकींची व सुरक्षेच्या दृष्टीतील सर्व गोष्टींची पाहणी केली. गणेश बेंन्झोप्लास्ट टाकीच्या परिसरात विद्यालयाबरोबरच मोठी लोकवस्ती असून जनतेच्या सुरक्षेच्या हिताने ह्या टाकीत नाफ्ता घालण्याचे बंद करण्याचा आदेश एमपीटीला देण्यात आलेले असल्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सांगितले.गुरूवारी (दि.१२) रात्री नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता भूमिगत वाहिनीद्वारे गणेश बेंन्झोप्लास्टच्या टाकीत भरण्यास सुरुवात केल्यानंतर या टाकीत अजूनपर्यंत ५०० टन नाफ्ता भरण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली. दोनापावला समुद्राच्या खडकात अडकलेली नू शी नलिनी जहाज तरंगविल्यानंतर गुरुवारी पहाटे मुरगाव बंदराच्या धक्का ८ मध्ये नांगरण्यात आली. ह्या जहाजात २३०० टन नाफ्ता असून, तो सडा येथील लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या गणेश बेंन्झोप्लास्टमध्ये भरण्यात येणार असल्याचे येथील नागरिकांना कळताच याबाबत तीव्र विरोध दर्शवण्यास सुरुवात झाली.नगरविकासमंत्री तथा मुरगावचे आमदार मिलींद नाईक यांनी गणेश बेंन्झोप्लास्टमध्ये नाफ्ता घालण्यास तीव्र विरोध करून असे केल्यास गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता. सडा येथील टाकीत नाफ्ता घालण्यास नागरिकांनी तसेच मंत्री नाईक यांनी विरोध करून सुद्धा एमपीटीने न्यायालयीन हवाला देऊन गुरुवारी (दि. १२) रात्री मुरगाव बंदरातून जाणा-या भूमिगत वाहिनीतून गणेश बेंन्झोप्लास्टमध्ये नाफ्ता भरण्याच्या कामाला सुरुवात केली. यामुळे सडा भागातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले होते. लोकांकडून नाफ्ता सडा येथील टाकीत भरण्यास विरोध होत असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने येथे काय सुविधा आहेत हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी गणेश बेंन्झोप्लास्टमध्ये येऊन पाहणी केली. त्यांच्याबरोबर नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, एमपीटीचे उपचेअरमन जी पी राय, मुरगाव भाजप मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगाव नगरपालिकेचे काही नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गणेश बेंन्झोप्लास्ट च्या जवळच परिसरात विद्यालये तसेच मोठी लोकवस्ती असल्याचे दिसून आले असल्याचे जिल्हाधिकारी रॉय यांनी सांगितले. गुरुवारी रात्री पासून एमपीटी ने नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता गणेश बेंन्झोप्लास्टमध्ये भरण्यास सुरवात केलेली असून ८ ते १० तासात या टाकीत ५०० टन नाफ्ता भरण्यात आलेला आहे. याभागात राहणा-या नागरीकांच्या सुरक्षेसाठी तसेच व्यक्त करण्यात येत असलेली भितीची परिस्थिती निर्माण न व्हावी यासाठी एमपीटी ला गणेश बेंन्झोप्लास्ट मध्ये नाफ्ता घालण्याचे बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सांगितले. नू शी नलिनी जहाजात असलेला २३०० मेट्रीक टन नाफ्ता रात्री कार्यवाहीला सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी सकाळ पर्यंत गणेश बेंन्झोप्लास्ट च्या टाकीत पूर्ण खाली करण्यात आला आहे का, असा प्रश्न केला असता हे खरे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून अजूनपर्यंत सदर टाकीत ५०० टनाच्या आसपास नाफ्ता घालण्यात आल्याचे शेवटी माहितीत सांगितले. जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी एमपीटी ला गणेश बेंन्झोप्लास्ट मध्ये घालण्यात येणारा नाफ्ता बंद करण्याचा आदेश दिल्याने नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त करून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी उचित पाऊल उचललेले असल्याचे सांगितले. सुरवातीपासूनच आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी गणेश बेंन्झोप्लास्ट मध्ये एक दिवस सुद्धा नाफ्ता ठेवण्यास विरोध केलेला असून नागरीकांच्या हीतासाठी ह्या टाकीत नाफ्ता घालण्यापासून बंद करून सरकारने उचित पावले उचललेली आहेत.एमपीटीने कधी व कोणाला घेऊन गणेश बेंन्झोप्लास्ट च्या टाकींची पाहणी (सुरक्षेच्या दृष्टीने) केली याबाबत आपल्याला माहीती नसल्याचे नाईक यांनी सांगितले. सध्या गणेश बेंन्झोप्लास्ट टाकीत भरण्यात आलेला सुमारे ५०० टन नाफ्ता पुन्हा भूमिगत वाहिनीतून नू शी नलिनी जहाजात नेण्यात येणार अशी माहीती मंत्री नाईक यांनी याप्रसंगी दिली. गणेश बेंन्झोप्लास्ट टाकीत भरण्यात आलेला ५०० टन नाफ्ता पुन्हा नू शी नलिनी जहाजात भरल्यानंतर त्या जहाजातील २३०० टन नाफ्ता दुस-या ठिकाणी खाली करण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहीती मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मिळालेली असल्याचे नाईक यांनी सांगितले. लोकांची सुरक्षा प्रथम असून, सुरुवातीला नाही तर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनहीतासाठी सदर पावले उचलून येथे घालण्यात येणारा नाफ्ता बंद करण्यासाठी पावले उचलल्याने नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी यावेळी बोलताना त्यांचे आभार व्यक्त केले.
गणेश बेंन्झोप्लास्ट टाकीत नाफ्ता भरण्यापासून बंद करण्याचा एमपीटीला दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 7:27 PM